हॉरर ऑफ ड्रॅॅकुला

हॉरर ऑफ ड्रॅॅकुला

हॉरर ऑफ ड्रॅॅकुला

चित्रपटात रहस्यपट, गूढपट, भयपट, धक्का देणारे, हादरवूून सोडणारे असे प्रकार लोकप्रिय ठरतात. कारण लोकांना त्या भावना अनुभवायला आवडतं. असं असलं तरी केवळ मोठमोठे आवाज, किंकाळ्या, एकदम कोणत्या तरी अक्राळ विक्राळ आकृतीचं दर्शन, या रामसे स्पेशल गोष्टींनी तात्पुरतं भय वाटलं तरी तो परिणाम फार काळ टिकणार नसतो.

कारणं काहीही असली तरी हे काही खरं नाही. अशी जाणीव कुठंतरी पाहणार्‍याला असते. पण जी भीती मनात झिरपत जाते. पाहणार्‍याच्या मनातील भयाची भावना दीर्घकाळ टिकवून ठेवते, तीच खरीखुरी भीती. आणि जो चित्रपट पाहताना, अशी भीती वाटते तोच खरा परिणामकारक भयपट म्हणायला हवा. अशा चित्रपटात प्रचंड आवाज, एकदम चित्रपट गृहात काळोखच काळोख, किंकाळ्या, चित्रविचित्र चेहरे, हिडीस व्यक्ती किंवा अरिष्टपटांसारखी प्रचंड हानी. असं काहीही असावं लागत नाही. उलट अशा काही बाबी समोर आल्या की प्रेक्षकांना रंजन झाल्यासारखं वाटलं, तरी हे सारं खोटं, कृत्रिम आहे ही जाणीव असते. अर्थातच तो थिएटरमधून बाहेर पडताना ही भीती चित्रपटगृहातच ठेवून येतो.

या उलट नेहमीसारखं वातावरण, मंद आवाजातील त्रास होणार नाही,असं संगीत ज्यात असतं, पात्रं तुमच्या-आमच्या सारखी वाटतात. घटना रोजच्या जीवनातील असतात. त्या कधीही, कुठंही घडू शकतील हे पटतं. आणि याला प्रभावी कथा, अस्सल अभिनयाची जोड असली की या चित्रपटांचा प्रभाव चांगलाच जाणवतो. इतकंच नाही, तर ते अविस्मरणीय बनतात. कारण साधं आहे, कोणतीही शंका का संशय नसताना एखाद्या पात्राचं खरं रूप अचानक डोळ्यापुढं येतं अन् प्रेक्षक दचकतो. जोडीला हलकेच लय काढणारं प्रभावी संगीत असेल तर भीती हळूहळू मनात झिरपायला लागते. प्रेक्षकाच्या अस्वस्थतेबरोबरच त्याची उत्कंठा काढत जाते. हे भय अशा प्रकारं झिरपलेलं असतं की, प्रेक्षक घरी पोहोचल्यानंतरही कित्येक दिवस ते त्याला छळतं.

या गटातला सर्वात प्रभावी चित्रपट म्हणून हॉरर ऑफ ड्रॅॅकुला या चित्रपटाचं नाव घेता येईल. हा अर्थातच या नावाचा पहिलाच चित्रपट. पीटर वुशिंग आणि क्रिस्टोफर ली यांच्या प्रमुख भूमिका असलेला. त्यानंतर या नावाचे व या विषयाकर अनेक चित्रपट आले. पण त्यापैकी एकालाही जुन्याची सर आली नाही. ब्रॅम स्टोवरच्या ड्रॅकुला, द प्रिन्स ऑफ डार्कनेस, या कादंबरीवर आधारलेला हा चित्रपट. खूपसा कादंबरीशी प्रामाणिक होता. बदल काय तो माध्यम बदलताना अपरिहार्यपणे करावा लागतो तेवढाच. (आणि काही अशक्यप्राय बाबी वगळून.) त्यानं कथेची परिणामकारकता कमी न होता, वाढलीच होती. कदाचित दृक्श्राव्य माध्यमाचा तो परिणाम असेल.

डेन्मार्कमधल्या एका पुराण्या गढीतील काऊंट ड्रॅकुला. तो अंधाराचा राजपुत्र, हे वर्णन अगदी अचूक. कारण सूर्यप्रकाशाचं त्याला पूर्ण वावडं आहे. तो त्यात राहूच शकत नाही. तसाच वाहत्या पाण्यापासूनही त्याला कायमचा धोका आहे. त्यामुळं तो नदी ओढ्यांच्या आसपासही फिरकत नाही. क्रॉसपासून दूरच राहातो. अंधारात त्याचं सामर्थ्य अचाट वाढतं. त्याची भूक मानवी रक्ताची. जिवंत माणसाच्या मानेलाच सुळे लावून तो ताजं रक्त पितो. त्या प्रमाणात त्याचं सामर्थ्य, आयुष्यही वाढत जातं. गढी भोवतीच्या ठराविक क्षेत्रात त्याचा प्रभाव असतो. तो फक्त मुक्या प्राण्यांनाच जाणवतो. त्यामुळंच जोनाथन हार्कर त्याच्या बायकोसह बग्गीतून येताना त्या भारित क्षेत्राच्या हद्दीपाशी येताच घोडे एकदम थांबतात आणि पुढं जायचंच नाकारतात. हे वर्णन वाचताना थरारक वाटतं, त्याहीपेक्षा प्रत्यक्ष पडद्यावरच्या गूढ वातावरणात अंधूक प्रकाशात अधिकच प्रभावी वाटतं.

एरवी त्याचं मानवी रूप आणि प्रभाव यामुळं लोक चटकन त्याच्या फशी पडतात. पण हे उमगेपर्यंत फार उशीर झालेला असतो. दीर्घकाळ कोणालाही संशय येत नाही. पण परिसरात का त्याबाहेरही होणार्‍या गूढ मृत्यूंमुळे लोकांत घबराट माजलेली असते. या सार्‍याचा शोध घेण्यासाठी जोनाथन, पत्नी मीना हिच्याबरोबर आलेला असतो. तो थेट डॅ्रकुलाच्याच गढीत उतरतो. दोघांत संभाषणही होत असतं. ड्रॅकुलाचे काही दूतही असतात. ते सावज त्याच्याजवळ आणतात. अशीच एक दुर्भागी ल्यूसी. ड्रॅकुलाच्याच पंथात ओढली गेलेली. तिला मीनाची मैत्री आवडते. मीनाला कसलाच संशय येत नाही. कारण दिवसा त्यांचं खरं स्वरूप कधीच प्रकट होत नाही. एकदा मावळतीनंतर ती मीनाला बोलावते, जवळ ये, आणखी जवळ ये, असं म्हणून तिला मिठी मारून तिच्या मानेजवळ तोंड उघडून जाते. तिचे सुळे आता भयानक दिसतात मीना किंचाळते. ती मीनाच्या मानेला चावणार एवढ्यात जोरात किंचाळून दूर पळते. जोनाथननं क्रॉस दोघींच्या मध्ये धरलेला असतो. आता जोनाथन आणि ड्रॅकुला यांच्यात उघड वैर येतं. पुढं जे काही घडतं ते प्रत्यक्ष पाहण्यात जी रंगत आहे, तेवढी कादंबरीतही नाही.

शेवटी ड्रॅकुलाच्या खोलीत जी त्यानं काळे पडदे लावून बंद केलेली असते (त्यामुळे तेथे सूर्यप्रकाश येऊ शकत नाही), त्या खोलीत या दोघांचं अखेरचं द्वंद्व होतं. भर दिवसा. आणि अचानक जोनाथनला उपाय सापडतो तो एक एक पडदा दूर करायला लागतो आणि जसजशी सूर्यकिरणे आत येतात तसतसा डॅ्रकुला हतबल होत जातो. आणि अखेर त्या सूर्य प्रकाशातच विरून जातो. त्याच्या मागं मात्र त्याचं रूप आणि दहशत मनात घेऊन प्रेक्षक परततात.

हा चित्रपट पाहिल्यावर कित्येकांनी सांगितलं की त्यांनी जवळ क्रॉस ठेवला, खिडकीकडं पाठ करूनच झोपले आणि काहीही झालं तरी डोकं वर करून पाहिलं नाही. कित्येक जण झोपेविना जागतच राहिले. न जाणो…
असा हॉरर ऑफ ड्रॅकुला. संधी मिळेल तेव्हा बघा आणि भीतीचा अनुभव घ्या.

-आ. श्री. केतकर.

First Published on: October 26, 2018 3:33 AM
Exit mobile version