दुग्धशर्करायोग ! ‘संज्या छाया’ची शंभरी आणि पुस्तक प्रकाशन

दुग्धशर्करायोग ! ‘संज्या छाया’ची शंभरी आणि पुस्तक प्रकाशन

मराठी रंगभूमीवर घोडदौड करणाऱ्या सध्याच्या काही नाटकांपैकी एक नाटक आहे ‘संज्या छाया’. या नाटकाचा शंभरावा प्रयोग नुकताच दीनानाथ नाट्यगृहामध्ये उत्साहात पार पडला. नाटकाची ‘शंभरी’ हे या प्रयोगाचे वैशिष्ट्य होतेच शिवाय, या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशनही यादरम्यान करण्यात आले.

काही वर्षांपूर्वीच जयवंत दळवीलिखित नाटक ‘संध्याछाया’ रंगभूमीवर आले होते. एका वृद्ध जोडप्याची ही कथा, ज्यांची दोन्ही मुले कामानिमित्त त्यांच्यापासून दूर असतात. एक भारतीय सैन्यात असतो, तर दुसरा परदेशात असतो. या जोडप्याला कुठलीही आर्थिक विवंचना नसली तरी एक खंत सतावत असते. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना, जो आधार व सोबतीची गरज हवी असते, ती त्यांच्याकडे नसते. स्वतःच्या सुखदुःख ज्याच्यासोबत वाटता येईल, काही दुखलं-खुपलं तर कोणी मदतीला येईल असे कोणीच नसते. औषधाला फक्त मुलांसोबत फोन आणि पत्रांच्या माध्यमातून संपर्क होत असतो. पण तरीही नात्यात एक अंतराळ कायमच असते. मुलं त्यांच्या करिअरमध्ये व्यस्त असतात. अशातच सैन्यात असलेला मुलगा लढाईत मारला जातो. दुसरा मुलगा परदेशात लग्न करून मोकळा होतो. आपल्या आई-वडिलांना त्याबद्दल कळवावे याचीही त्याला गरज वाटत नाही. अंतिमतः एक दिवस हे वृद्ध जोडपे निराश होते आणि विष प्राशन करून आत्महत्या करते. असा हा जयवंत दळवी लिखित संध्या छायेचा एक निराश आणि अस्वस्थ करणारा अनुभव !… अगदी याच धर्तीवर काही काळापूर्वी प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणखी एक नाटक रंगभूमीवर अवतरले. ज्याचे नाव आहे ‘संज्या छाया’ !

‘संज्या छाया’चे मूळ कथानक जरी ‘संध्याछाया’शी मिळतेजुळते असले, तरी याच्या लेखक- दिग्दर्शकांनी नाटकाला एक वेगळी सकारात्मक कलाटणी दिली आहे. नोकरी-धंद्यातून जरी निवृत्त झालो तरी मरणाची वाट पाहत प्रत्येक क्षण मरण जगण्यापेक्षा आपल्याला आनंद मिळेल अशा कामांमध्ये-छंदांमध्ये स्वतःला रमवायचे-गुंतवायचे. आपणही आनंदी जगायचे आणि इतरांच्याही जीवनातही आनंद पेरायचा. अशा उत्साही आणि सकारात्मक विचार ‘संज्याछाया’ हे नाटक घेऊन आले.

याचे लेखक प्रशांत दळवी यांनी जयवंत दळवींच्या मूळ कथेतून घेतलेल्या गाभ्यातील नैराश्य- उदासीनता अगदी बेमालूमपणे बाजूला करून, त्यात आशेची किरणे सोडली आहेत. अर्थातच दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाची कमालही त्यात आहेच. त्यांनी नाटकाच्या मूळ गंभीर गाभ्याला धक्का न लावता, नाटक कुठेही चर्चात्मक होणार नाही, त्याचा वेग कायम राहील याची काळजी घेतली आहे. सोबतच योग्य ठिकाणी झालेली विनोदांची पेरणी हेही त्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. लेखक दिग्दर्शकांच्या या प्रयासांना चार चाँद लावले ते वैभव मांगले आणि निर्मिती सावंत या जोडगोळीच्या नाटकातील जुगलबंदीने !… शक्य तिथे रसिक प्रेक्षकांच्या ओठावर हसू आणि आसू आणण्याचे कसब या जोडीने खुबीने साकारले आहे. सोबतच नाटकात काम करणाऱ्या सुनील अभ्यंकर, योगिनी चौक बोऱ्हाडे, अभय जोशी, आशीर्वाद मराठे, मोहन साटम, संदीप जाधव, राजस सुळे या कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखेला योग्य तो न्याय दिला आहे. नाटकाचे पार्श्वसंगीत त्यातील विविध प्रसंगातील गहिरेपण रसिक-प्रेक्षकांपुढे अधिक ताकदीने पोचवण्याचे काम करते. याचे सर्व श्रेय पुरुषोत्तम बेर्डे यांना जाते. अनुभवी नेपथ्यकार प्रदीप मुळे यांचे नेपथ्य नाटकाला परीपूरक आहे. रवी-रसिक यांची सुरेख प्रकाशयोजना या नाटकाला आहे. दासू यांनी गीतलेखन केले असून, अशोक पत्की यांनी या नाटकाचे संगीत केले आहे. प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव यांची वेशभूषा आणि उलेश खंदारे यांची रंगभूषा या नाटकाला लाभली आहे. दिलीप जाधव व श्रीपाद पद्माकर हे या नाटकाचे निर्माते असून, प्रणित बोडके हे सूत्रधार आहेत.

मुख्य म्हणजे नाटकाच्या शंभरी आधीच यंदाच्या ‘मा. दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कारानेही या नाटकाला गौरवण्यात आले आहे. निखळ मनोरंजनासह बदलत्या काळानुसार, नव्या सकारात्मक विचारांचा बूस्टर डोस म्हणजे ‘संज्या छाया’ असे म्हणायला हरकत नाही. या नाटकाच्या शंभरी निमित्त नव्या पिढीचे नाटककार प्राजक्त देशमुख, नीरज शिरवईकर, स्वरा मोकाशी, कल्याणी पाठारे व आदित्य मोडक यांच्या हस्ते ‘संज्या छाया’ या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

नाटकाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना नाटककार प्रशांत दळवी म्हणाले, ” पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे माझे सहावे नाटक आहे. मला असे मनापासून वाटले की तरुण नाटककारांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे. कारण प्राजक्त, नीरज, स्वरा, कल्याणी व आदित्य या पाचही जणांची नाटके मी बघितलेली आहेत आणि त्यांच्या नाटकांनी मी प्रभावित झालेलो आहे. एखादे नाट्यगृह कोट्यवधी रुपये खर्च करून बांधणे सोपे आहे; पण एखादे नवीन नाटक लिहिणे त्यापेक्षाही अवघड आहे. हे अवघड काम या तरुण पिढीने केलेले आहे. मराठी नाटक जिवंत ठेवायचे असेल, तर अशा तरुण पिढीची आपल्याला गरज आहे. या पाचही जणांचे वैशिष्ट्य असे की त्यांनी पहिल्याच नाटकात षटकार मारलेला आहे. व्यावसायिक रंगभूमीसाठी आपल्याला लिहायचे आहे म्हणून त्यांनी कुठेही तडजोड वगैरे केलेली नाही. त्यांच्या प्रत्येक नाटकाला प्रेक्षक आणि समीक्षक यांच्या शाबासकीची थापही मिळाली आहे. पुरस्कारांची मोहोरही त्यांच्या नाटकांवर उमटलेली आहे. या तरुणांनी त्यांच्या आवडीचे नाटक त्यांच्या पद्धतीने लिहिलेले आहे, हे मला महत्त्वाचे वाटते.”

First Published on: November 29, 2022 10:52 AM
Exit mobile version