किंग जे डी चा अभिनव प्रयोग

किंग जे डी चा अभिनव प्रयोग

Abhinav Pryog

आता खरं सांगायचे म्हणजे चित्रपटाची निर्मिती करणे तसे सोपे आहे. परंतु त्याचे प्रमोशन, प्रदर्शन, डबिंग या गोष्टी करणे तसे अवघड. शूटींगसाठी कलाकाराने वेळ दिला म्हणजे डबिंग, प्रमोशनाला तेवढाच वेळ देईल हे सांगता येणे कठीण आहे. त्यात थिएटर मिळवणे ही आणखीन एक अडचण असते. असं असतानासुद्धा काही निर्माते धाडस करून वेगवेगळे प्रयोग करत असतात. हाऊसफुल्लच्या गर्दीत चित्रपट चालत असताना मधेच एखादे गाणे चित्रपटात टाकणे किंवा शेवट वेगळा करणे या गोष्टी यापूर्वीही झालेल्या आहेत. ‘भाई व्यक्ती की वल्ली’ याचा पूर्वार्ध-उत्तरार्ध काही दिवसांच्या अंतराने प्रदर्शित करणे हासुद्धा अभिनव प्रयोगच म्हणावा लागेल. ‘मी पण सचिन’ हा चित्रपट तुम्हाला माहीत आहेच, ज्यात स्वप्निल जोशीने मुख्य भूमिका निभावलेली आहे. अनुजा साठे-गोखले, अभिजित खंडकेकर, प्रियदर्शन जाधव, कल्याणी मुळे, मृणाल जाधव यांचाही या चित्रपटात सहभाग होता.

आता हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. म्हणताना आता नवीन काय असे वाटणे साहजिकच आहे. श्रेयस जाधव हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. दिग्दर्शक म्हणून तो जेवढा माहिती आहे तेवढाच तो रॅपर म्हणूनही ओळखला जातो. किंग जे. डी.हे त्याचे या विश्वातले नाव आहे. चित्रपटाला जे काही यश मिळाले त्यात प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे, त्यांना थँक्स म्हणावे असे श्रेयसला वाटते आणि मग त्याने त्यातून एक अभिनव प्रयोग केलेला आहे, तो म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी रॅप साँग त्याने तयार केलेले आहे. अपयशाने हरू नका, पुन्हा जिद्दीने उभे रहा असे त्याने या गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहुदा ते प्रेरणा देणारे ठरणार आहे.

First Published on: February 14, 2019 5:03 AM
Exit mobile version