भाजपा आयोजित दीपोत्सवात राहुल देशपांडेंचा अपमान !

भाजपा आयोजित दीपोत्सवात राहुल देशपांडेंचा अपमान !

गोष्ट आहे ‘मराठी सन्मानाचा मराठमोळा दीपोत्सव’ या भाजपा आयोजित दिवाळी कार्यक्रमाची. हा कार्यक्रम वरळीच्या जांभोरी मैदानावर नुकताच पार पडला. शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व्यासपीठावर त्यांच्या गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात तल्लीन होते. कार्यक्रम अगदी रंगात आला होता. नेमके त्याच वेळी प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ याचे आगमन झाले. आयोजकांचे सारे लक्ष टायगरच्या स्वागतावर केंद्रित झाले. हे करताना कार्यकर्ते आणि भाजप आमदार मिहीर कोटेचा, आपण एका नामवंत गायकाचा आणि त्याच्या गायकीचा अपमान करतोय हेच विसरून गेले.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे गाणे चालू असतानाच टायगर श्रॉफ तिथे पोहोचला. भाजप आमदार मिहीर कोटेचा ऐन कार्यक्रमात त्याला घेऊन व्यासपीठावर गेले. ते पाहून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या पुष्कर श्रोत्रीने पाच मिनिटाचा ब्रेक घेण्याचे आवाहन केले. हे ऐकताच कार्यक्रमात मग्न असलेल्या राहुल देशपांडेंनी नाराजी व्यक्त केली. ते पुष्करला जवळ बोलवून म्हणाले,” एक मिनिटाचाही ब्रेक घेतला तर मी गाणार नाही. माझं गाणं होईपर्यंत मला ब्रेक नकोय, नाहीतर मी गाणार नाही. त्यांना म्हणावं, एक वीस मिनिटं थांबा. वीस मिनिटांत मी माझं गाणं संपवतो. आणि मग काय जे करायचंय ते करा. हे असलं मला नाही चालणार. अदर्वाइज मी उठतो.”

दरम्यान कोटेचा व्यासपीठावर आले असता. राहुल देशपांडेंनी त्यांनाही, ” मी उठू का?” असा प्रतिप्रश्न केला. पण कोटेचांनी राहुलना न जुमानता टायगर श्रॉफला व्यासपीठावर आमंत्रित करून त्याचे आदरातिथ्य केले आणि उपस्थितांना आपल्या राजकीय मुजोरीचे दर्शन घडविले. सदर संवाद व्यासपिठावरील मायक्रोफोनच्या माध्यमातून ऐकू येत होता. एवढेही भान आयोजकांना नव्हते.


हेही वाचा :

ओरमॅक्स मीडियाच्या बहुप्रतीक्षित आगामी चित्रपटांच्या यादीत ‘पुष्पा २’ पहिल्या स्थानी

First Published on: October 21, 2022 12:39 PM
Exit mobile version