भारताच्या कोरोना लघुपटांचा झेंडा सातासमुद्रापार

भारताच्या कोरोना लघुपटांचा झेंडा सातासमुद्रापार

सध्या जमाना डिजिटलचा आहे. अधिकाधिक प्रेक्षकवर्ग वेबसीरिज पाहण्यातच आता दंग असतो. लघुपट मनोरंजन तर करतातच त्याचबरोबर काही तरी सामाजिक संदेशही देऊन जातात. जगभर सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक प्रबोधन करणाऱ्या तीन लघुपटांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. ‘पोर्ट ब्लेयर’, ‘सिंगापूर’ आणि ‘इंडोनेशिया’ येथील फेस्टिवलमध्ये आशिष निनगुरकर लिखित- दिग्दर्शित लघुपटांनी वाहवा मिळवली आहे.

आशिषने घरात राहून ‘कोरोना’ विषयक सामाजिक संदेश देणाऱ्या ‘नियम’, ‘कुलूपबंद’ आणि ‘संक्रमण’ या लघुपटांची निर्मिती केली होती. अत्यंत कमी वेळेत उत्कृष्ट सामाजिक संदेश देणाऱ्या या लघुपटांची नोंद याअगोदर कॅनडाच्या ‘वर्ल्ड ग्लोब’ या संस्थेने घेतली होती व त्याचा अनोखा असा प्रीमियर टोरंटोमध्ये पार पडला होता. अनेक फेस्टिवलमध्ये दखल व पुरस्कारप्राप्त कोरोविषयक जनजागृती करणाऱ्या लघुपटांना आता ‘पोर्ट ब्लेयर’, ‘सिंगापूर’ आणि ‘इंडोनेशिया’ येथील फेस्टिवलमध्ये प्रचंड दाद मिळाली आहे.  ‘एअरटेल प्लेयर’, ‘हंगामा प्ले’, ‘एम एक्स प्लेयर’ आणि ‘जियो सिनेमा’ बरोबरच अनेक डिजिटल ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनाची देखील संधी मिळाली असून त्याला देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आशिष स्वतःच लेखक असल्याने त्याने या तिन्ही लघुपटांची मांडणी अत्यंत नेटकी केली असून योग्य आशय उत्तमरीत्या मांडला आहे. “एकत्र येण्याची नको घाई,पुन्हा हा जन्म नाही”, ‘नियम पाळा,कोरोना टाळा’ व बाहेरच्या जिल्ह्यातून घरी आल्यावर ‘क्वारंटाईन’ म्हणून ‘नियम’ पाळणे बंधनकारक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘सोशल डिस्टन्स’ ठेवून सगळ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. ‘सुरक्षित अंतर पाळा,कोरोना संसर्ग टाळा’ असा अनमोल संदेश या लघुपटांमधून देण्यात आला आहे.

नियम, कुलूपबंद आणि संक्रमण या लघुपटांची निर्मिती ‘काव्या ड्रीम मुव्हीज’ अंतर्गत किरण निनगुरकर यांनी केली असून या लघुपटांमध्ये अशोक निनगुरकर, जयश्री निनगुरकर, स्वरूप कासार, अनुराग निनगुरकर, प्रदीप कडू, प्रतिश सोनवणे, विजय कांबळे, सुमेध गायकवाड, सुनील जाधव आणि सिद्धेश दळवी यांनी भूमिका साकारल्या आहेत.अभिषेक लगस यांनी या लघुपटांचे संकलन केले असून कॅमेरामन, संकल्पना, लेखन व दिग्दर्शन अशी चौफेर धुरा आशिष निनगुरकर यांनी सांभाळली आहे. घरात राहून तयार केलेल्या या लघुपटांनी सातासमुद्रापार डिजिटल झेंडा रोवला आहे. या लघुपटांना आता तुम्ही ‘एअरटेल प्लेयर’, ‘हंगामा प्ले’ व ‘एम एक्स प्लेयर’ या डिजिटल ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता.

 

First Published on: June 13, 2021 8:51 PM
Exit mobile version