जान्हवीच्या ‘या’ नव्या चित्रपटाची घोषणा!

जान्हवीच्या ‘या’ नव्या चित्रपटाची घोषणा!

जान्हवी कपूर (फाईल फोटो)

धडक चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी जान्हवी कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. पहिल्याच चित्रपटामुळे लाईम लाईटमध्ये आलेली जान्हवी सध्या स्टारडम अनुभवते आहे. धडक चित्रपटातील आपल्या अभिनयामुळे जान्हवीने देशभरातील प्रेक्षकांची मनं  जिंकली आहेत. धडकच्या यशानंतर आता जान्हवी काय करणार? याची तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असतानाच, जान्हवीच्या नव्या चित्रपटाचं नाव समोर आलं आहे. विशेष म्हणजे ‘धडक’चा दिग्दर्शक शंशाक खेतान हाच जान्हवीच्या नव्या चित्रपटाचा दिग्दर्शक असेल. या चित्रपटाच्या निमित्ताने जान्हवी आणि शशांक ही जोडी पुन्हा एकत्र काम करणार आहे. जान्हवीचा नवा चित्रपट येतो आहे, ही बातमी नक्कीच तिच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे.

‘हा’ असेल नवा चित्रपट

एका इंग्रजी वेब पोर्टलनुसार जान्हवी कपूर ‘रणभूमी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार असून, शशांक खेतान त्याचं दिग्दर्शन करणार आहे. विशेष म्हणजे रणभूमी चित्रपटात जान्हवीसोबत अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यामध्ये विशेष असे, की जान्हवीने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, वरुणसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे वरुण धवनसोबत सिल्व्हर स्क्रीन शेअर करण्याचं जान्हवीचं स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होणार, असंच म्हणावं लागेल. खरंतर धडक चित्रपट रिलीज होण्याआधीपासूनच वरुण आणि जान्हवी चित्रपटात एकत्र काम करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, चित्रपटाचं नाव आतापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, एकीकडे जान्हवी आणि वरुणच्या नावांची चर्चा होत असताना, दुसरीकडे रणभूमी चित्रपटात वरुण धवनसोबत आलिया भट्ट झळकणार असल्याचं बोललं जात आहे. आता नेमका हा चित्रपट कोणाच्या पदरात पडतोय? हे येणारी वेळच सांगेल. मात्र, तूर्तास तरी रणभूमीमध्ये जान्हवीच झळकणार असल्याचे नक्की झाले आहे.
रणभूमी हा एक रिव्हेंज ड्रामा चित्रपट असून, तो २०२० च्या दिवाळी दरम्यान रिलीज होईल, अशी चर्चा आहे.
First Published on: July 30, 2018 8:59 PM
Exit mobile version