सलमानसाठी व्यक्त केल्या कमल हसननं भावना

सलमानसाठी व्यक्त केल्या कमल हसननं भावना

सलमान खान आणि कमल हसन

 

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘विश्वरूपम – २’ च्या प्रमोशनात व्यस्त आहे. १८ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पहिल्यांदाच कमल हसन सलमान खानच्या ‘दस का दम’ मध्ये आले होते. मंगळवारी या रियालिटी शो चा निवेदक आणि सुपरस्टार सलमान खान याच्यासह कमल यांनी प्रमोशनल एपिसोडचं शूटिंग पूर्ण केलं. आपल्या इन्स्टाग्रामवरून कमल हसन यांनी स्वतः फोटो पोस्ट केला आहे.

काय म्हणाले सलमानबद्दल कमल?

कमल हसन या गेम शो साठी आले असता सलमान खानला भेटून आणि त्याच्याबरोबर चित्रीकरण करून आनंदी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दोघांनीही पहिल्यांदाच रियालिटी टेलिव्हिजन शोमध्ये एकत्र काम केलं आहे. याविषयीचा फोटो पोस्ट करताना ‘भाई असावा तर असावा, बऱ्याच दिवसांनी भेटून आनंद झाला.’ अशी कॅप्शन देत आपली भावना कमल हसन यांनी व्यक्त केली.

पहिल्या ‘विश्वरूपम’ला सलमानचा होता पाठिंबा

सलमाननं २०१३ मध्ये आलेल्या ‘विश्वरूपम’च्या प्रदर्शनाच्या वेळी समर्थन दर्शवलं होतं. त्यावेळी संपूर्ण भारतात या चित्रपटाच्या बाबतीत वाद निर्माण झाला होता. त्यावेळीच सलमाननं चाहत्यांना चित्रपट बघण्यासाठी आर्जव केलं होतं. इतकंच नाही तर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगलादेखील सलमान उपस्थित राहिला होता. त्यामुळं यावेळीदेखील कमल हसननं सलमानच्या शो मध्ये उपस्थिती लावली आहे. दरम्यान या शो च्या वेळी अभिनेता करण पटेल आणि अभिनेत्री शिल्पा शिंदे हेदेखील उपस्थित होते. ‘विश्वरूपम २’चं ट्रेलर जूनमध्ये प्रदर्शित करण्यात आलं. तर हा चित्रपट १८ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं चित्रीकरण तामिळ आणि हिंदीमध्ये करण्यात आलं असून तेलुगूमध्ये डबिंग करण्यात आलं आहे. कमल हसन बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर चाहत्यांना दिसणार आहे.

 

 

First Published on: July 18, 2018 5:43 PM
Exit mobile version