कपिल शर्मानं पुन्हा केलं ‘ट्विट’!

कपिल शर्मानं पुन्हा केलं ‘ट्विट’!

कपिल शर्मा (सौजन्य - इंडियन एक्स्प्रेस)

कपिल शर्मा आणि वाद हे समीकरणच आहे. गेल्या एका वर्षापासून कपिलच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट संपण्याचं नाव घेत नव्हतं. त्यात त्याचा नव्यानं आलेला शो देखील बंद झाला. एक महिन्यापूर्वी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर कपिलनं गुरुवारी रात्री परत ट्विट केलं आहे. मात्र, यावेळी आपला मित्र डॉ. झिऊस आणि झोरा रंधवा यांच्या नव्या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट करत त्यानं त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला.

कपिलचा अंदाजही अजूनही तसाच

कपिलनं ट्विट केल्यानंतर चाहत्यांनी त्याला इतके दिवस कुठे आहे? असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावर ‘प्रवास करत होतो’ अशी प्रतिक्रिया कपिलनं दिली. तर एका नेटिझननं आपण कपिलची खूप आठवण काढत असून सध्या त्याच्या कार्यक्रमांचे जुने भाग बघत असल्याचं सांगितलं. त्यावर ‘काही हरकत नाही, आपण लवकरच काहीतरी नवीन घेऊन येऊ’ असं सकारात्मक उत्तर कपिलनं दिलं. एकानं तर ‘तू सध्या घरी बसून जाडा झाला आहेस का?’ असा प्रश्न विचारला असता ‘हो जाडा झालो आहे, पण परत पहिल्या आकारात येण्याचा प्रयत्न करत आहे’ असं सांगितलं. ‘बाबा विचारत आहेत तुम्ही तुमचा डीपी कधी बदलणार?’ असा प्रश्न विचारणाऱ्या नेटिझनला आपल्या नेहमीच्या अंदाजात ‘माझ्या पूर्वीच्या आकारात आल्यानंतर’ असं मजेत त्यानं म्हटलं. सर्वात शेवटी त्यानं आपण आता स्वतःला बदलत असून सर्वांनी काळजी घ्या असं म्हटलं आहे.

मागच्या दोन महिन्यापासून कपिल आहे टेलिव्हिजनपासून दूर

गेल्या वर्षी सुनील ग्रोव्हरबरोबर झालेल्या वादानंतर कपिलच्या मागे साडेसातीच सुरु झाली. कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा त्याचा शो बंद झाला आणि त्यानंतर आलेला फॅमिली टाईम विथ कपिलदेखील एका आठवड्यात कपिलच्या तथाकथित वागणुकीमुळे बंद झाला. या सर्व घटनांनंतर कपिलविषयी बऱ्याच वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. पण कपिल कधीही मीडियासमोर त्यानंतर आला नाही. एक महिन्यानंतर त्यानं पहिल्यांदाच ट्विटरवर लोकांशी संवाद साधला.

First Published on: June 8, 2018 10:14 AM
Exit mobile version