कॉमेडियन कपिल शर्माही चढणार बोहल्यावर

कॉमेडियन कपिल शर्माही चढणार बोहल्यावर

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ

नुकतंच रणवीर आणि दीपिकाने आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली आणि लागोपाठ आता आज प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यानेही गिन्नी चथरहबरोबरील आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. इंग्रजी वृत्तपत्र ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कपिल शर्माने आपल्या लग्नाबद्दल गोष्टी उघड केल्या आहेत. याचवर्षी १२ डिसेंबरला जालंधरमध्ये कपिल आणि गिन्नी लग्नबंधनात अडकणार असल्याचं कपिलनं जाहीर केलंय. इतकंच नाही तर या दोघांच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन दोन दिवसानंतर अर्थात १४ डिसेंबरला असून यामध्ये आपल्या सर्व मित्रांना आणि टीव्ही जगतातील सर्व कुटुंबाला आमंत्रण देणार असल्याचंही कपिलनं स्पष्ट केलं आहे.

थाटामाटात करणार कपिल लग्न

कपिलचं लग्न थाटामाटात व्हावं असं कपिलच्या आईचं स्वप्नं आहे आणि आपल्या आईसाठीच आपण थाटामाटात लग्न करणार असल्याचं कपिलनं सांगितलं आहे. कपिलला साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं मात्र त्याच्या मोठ्या भावाचं लग्नही पैशाअभावी अगदी साध्या पद्धतीने झालं होतं. तेव्हा आता कपिलचं लग्न थाटामाटात व्हावं असं कपिलच्या आईला वाटत आहे. शिवाय कपिलची होणारी पत्नी गिन्नी ही एकुलती एक असल्यामुळे तिच्याकडूनही लग्न मोठं करण्यात यावं हीच अपेक्षा असल्याचंही कपिलनं सांगितलं आहे. आपल्या मोठ्या भावाचं लग्न जरी थाटामाटात झालं नसलं तरीही बहिणंचं लग्न कपिलनं अगदी थाटामाटात करून दिलं होतं.

‘मी आनंदी पण आई जास्त आनंदी’

गिन्नीशी लग्न होणार असल्यामुळे आनंदी आहात का? या प्रश्नावर कपिलनं ‘मी आनंदी आहे पण माझी आई जास्त आनंदी आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसेलच. माझ्या आईला निदान या वर्षाच्या शेवटपर्यंत तरी मी लग्न करावं असं वाटत आहे.’ असं उत्तर कपिलनं दिलं आहे. कपिलने गिन्नी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याचं गेल्या वर्षी जाहीर केलं होतं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. मात्र इतक्या सगळ्या चढउतारानंतर आता कपिल आणि गिन्नी बोहल्यावर चढणार आहेत. गेल्यावर्षी सुनील ग्रोव्हरबरोबर झालेल्या भांडणानंतर पुन्हा एकदा एक वर्षाने कपिल टेलिव्हिजनवर परतत आहे.

First Published on: October 22, 2018 7:54 PM
Exit mobile version