लहान गावात जाऊन करीना सोडवणार महिलांच्या समस्या

लहान गावात जाऊन करीना सोडवणार महिलांच्या समस्या

अभिनेत्री करीना कपूर खान

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर बऱ्याच कालावधीपासून युनिसेफच्या साथीनं भारतातील मुलींना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी कार्यरत आहे. करीना युनिसेफची गुडविल अँबेसेडर असून लहान मुलं आणि महिलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काम करत आहे. मुलींना शिक्षण मिळावं यासाठी करीना नेहमीच भाष्य करते आणि त्यासाठी तिचे प्रयत्नही असतात. भारतामध्ये बऱ्याच अशाही महिला आहेत, ज्यांना गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये नक्की काय काळजी घ्यायची? याची कल्पनाही नसते. याचसंदर्भात करीना लहान लहान गावांमध्ये जाऊन जागरूकता निर्माण करणार आहे.

महिलांमध्ये निर्माण करणार जागरूकता

युनिसेफसह करीना एक कँपेन करणार आहे. ज्यामध्ये लहान लहान गाव आणि शहरांमध्ये जाऊन महिलांना गर्भावस्थेतील सुरुवातीच्या दिवसात काळजी कशी घ्यायची याविषयी जागरुकतेचे धडे देणार आहे. करीना स्वतःही एक आई असून महिलांनी आपल्या बाळाला दूध पाजण्याचं महत्त्व तसंच कशा प्रकारे दूध पाजू शकतात याविषयीदेखील माहिती देणार आहे. तसंच गर्भावस्थेत असताना त्रासिक अशा रितीरिवाजांबाबतही करीना या महिलांसमोर भाष्य करणार असून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच, लहान मुलींच्या सुरक्षेबाबतही करीना बोलणार आहे. सध्या भ्रूण हत्या ही सर्वात मोठी समस्या भारतामध्ये आहे. या कँपेननुसार, करीना दर दोन महिन्यांनंतर एकदा लहान शहरात जाणार असून, जास्तीत जास्त मुलांना स्वस्थ आणि चांगलं जीवन मिळावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं करीनानं सांगितलं आहे. दरम्यान करीना सध्या आपला मुलगा तैमूरकडे जास्त लक्ष देत असून तैमूरही जन्मापासूनच चर्चेचा विषय बनला आहे. रोज तैमूरच्या बातम्या मीडियामध्ये प्रसिद्ध होत असतात.

First Published on: July 27, 2018 7:33 PM
Exit mobile version