‘कौन बनेगा करोडपती 14’ मध्ये निखत झरीन आणि साइखोम मीराबाई चानू हॉटसीटवर

‘कौन बनेगा करोडपती 14’ मध्ये निखत झरीन आणि साइखोम मीराबाई चानू हॉटसीटवर

अलीकडे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील भारताच्या कामगिरीचा गौरव करत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 14 मध्ये येत्या आठवड्यात या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणार्‍या साइखोम मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) आणि निखत झरीन (बॉक्सिंग) यांचे हॉटसीटवर स्वागत करण्यात येणार आहे. होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून या दोघी या खेळातही जेव्हा एक एक उत्तरे देत मोठ्या रकमेच्या जवळ पोहोचतील, तेव्हा प्रेक्षकांची उत्कंठा वाढत जाईल. या भागात या दोघी एकमेकींशी देखील बर्‍याच गप्पा मारताना दिसतील आणि प्रेक्षकांना त्या आपले अनुभव सांगतील. CWG मधील विजयाचा क्षण आणि त्यावेळी इतर सर्व देशांच्या वर आपला तिरंगा फडकताना पाहण्याचा रोमांचक अनुभव कसा होता, याविषयी त्या बोलतील.

ज्या देशाने भारतावर राज्य केले, त्या देशात भारताचा झेंडा इतक्या उंच फडकताना बघताना कसे वाटले याबद्दल निखत देखील आपल्या भावना व्यक्त करताना दिसेल. “तो अत्यंत संस्मरणीय असा क्षण होता, कारण ज्यावेळी मला पोडियमवर सुवर्ण पदक अर्पण करण्यात आले, तेव्हा राष्ट्रगीत वाजत होते आणि जेव्हा आपला ध्वज फडकावण्यात आला, तेव्हा मी प्रेक्षकांकडे वळून बघितले होते, की ते सर्व उभे आहेत की नाही. पण भारतीयच नाही, तर परदेशी लोकांनाही जेव्हा मी उभे राहिलेले पाहिले तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून आला आणि मी ताठ मानेने आपले राष्ट्रगीत म्हटले. तो खरोखर एक भावुक क्षण होता. ज्या देशातील लोकांनी आपल्यावर राज्य केले ते लोक आज आपल्या ध्वजाचा मान राखत होते आणि आपले राष्ट्रगीत म्हणत होते ही एक भारतीय म्हणून माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती.”

निखत झरीन तिने जिंकलेली रक्कम ‘हैदराबाद रनर्स सोसायटी’ला दान करताना दिसेल. या ना-नफा संस्थेचे उद्दीष्ट रनिंगला (धावणे) फिटनेससाठीची प्रमुख अॅक्टिव्हिटी करून एक सक्रिय जीवनशैली अंगिकारण्यासाठी लोकांना मदत करण्याचे आहे. मीराबाई चानू तिने जिंकलेली रक्कम NEWS (नेटवर्क ऑफ इकॉनॉमी अँड वेल्फेअर सर्व्हिस) ला दान करणार आहे, जी संस्था अंध आणि मूकबधिर मुलांना त्यांची अभ्यासेतर कौशल्ये विकसित करण्यास प्रोत्साहन देते.


हेही वाचा : ‘शिवप्रताप गरुडझेप’मध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत यतीन कार्येकर

First Published on: September 6, 2022 1:23 PM
Exit mobile version