कुणी येणार गं…

कुणी येणार गं…

मुंबई - पुणे - मुंबई ३

सतीश राजवाडे, स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या मुंबई पुणे मुंबई चित्रपटाचे दोन्ही भाग गाजले आणि आता लवकरच याचा तिसरा भागही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं पहिलं गाणं कुणी येणार गं प्रदर्शित झालं आहे. चित्रपटातील गौरी आणि गौतमचं फुलत जाणारं प्रेम पहिल्या भागात दाखवण्यात आलं होतं. तर दुसऱ्या भागात लग्न करायचं की नाही या द्वंद्वात असणारी गौरी आणि तिला समजून घेणारा गौतम दाखवण्यात आला होता. त्यामुळे आता तिसऱ्या भागात नक्की काय याचा अंदाज प्रेक्षकांना होताच. त्यामुळे आता या तिसऱ्या भागामध्ये कुणी येणार आहे. लग्नानंतरची ही गोष्ट घेऊन पुन्हा एकदा ही त्रयी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

नवा पाहुणा येणार भेटीला

टीझरमधून गौरी आणि गौतमच्या घरी नवा पाहुणा येणार हे प्रेक्षकांनाही कळलंच आहे. यावरच आधारित पहिलंच ‘कुणी येणार गं’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘गोड बातमी देणारं कुणी येणार गं’ अशी कॅप्शन देत स्वप्नील जोशीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हे गाणं पोस्ट केलं आहे. सुखी संसाराला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता त्यांच्या संसारात नवा पाहुणा येणार आहे आणि त्याच्या स्वागतासाठी पूर्ण कुटुंब सज्ज झाल्याचं या गाण्यातूनही दिसत आहे. गौरीचं डोहाळे जेवणही या गाण्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ‘मुंबई – पुणे – मुंबई ३’ मध्ये गौरी आणि गौतमच्या प्रेमाचं नवं वळण प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चित्रपट ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांनाही आता या तिसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे.

First Published on: November 13, 2018 3:56 PM
Exit mobile version