‘आयुष्याच सार्थक झालं’; लतादीदींच्या त्या प्रतिक्रियेवर सुबोध भावे भावूक

‘आयुष्याच सार्थक झालं’; लतादीदींच्या त्या प्रतिक्रियेवर सुबोध भावे भावूक

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कौतुकाची थाप ही कोणत्याही कलाकारासाठी सर्वोच्च सन्मानापेक्षा कमी नाही. अशीच कौतुकाची थाप अभिनेता सुबोध भावे यांना मिळाली आहे. खुद्द लता मंगेशकर यांनी सुबोध भावे अभिनित बालगंधर्व या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. लतादीदींनी फेसबुकवर हा चित्रपट पाहिल्याचे म्हणत त्या काळातील बालगंधर्व यांच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या या पोस्टवर सुबोध भावे यांनी कृतज्ञता व्यक्त करत आयुष्याचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. २०११ साली प्रदर्शित झालेल्या निर्माते नितीन देसाई यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले होते. सुबोध भावे यांनी मराठी रंगभूमीवर २० व्या शतकात अतिशय लोकप्रिय ठरलेले गायक-अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांची भूमिका यात साकारली होती.

काय म्हणाल्या लतादीदी 

आज मी पहिल्यांदा बालगंधर्व हा मराठी सिनेमा पाहिला. नाट्य संगीत क्षेत्रातील महान कलाकार बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. बालगंधर्व यांना प्रत्यक्ष भेटण्याचा दोन – तीन वेळा योग आला होता. माझ्याशी खुप प्रेमाने भेटायचे. मला आशिर्वाद द्यायचे. माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला त्यांना आमंत्रित केले होते. त्यांनी तिथे भजन गायले होते. हा चित्रपट पाहताना ते सर्व दिवस आठवले. त्यांच्या आयुष्यातील ज्या काही गोष्टी मला माहिती नव्हत्या त्यादेखील माहित झाल्या. हा चित्रपट उत्तम बनला आहे. बालगंधर्व यांची भूमिका साकारणारे अभिनेता सुबोध भावे आणि त्यांच्यासाठी पार्श्वगायन करणाले गायक आनंद भाटे तसेच इतर कलाकारांचे अभिनंदन. असे नमूद करत लतादीदींनी हा दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये लतादीदींसोबत बालगंधर्व, वसंत देसाई, बेगम अख्तर आणि अंजलीबाई मालपेकर आदी दिग्गज मंडळी दिसत आहेत.

हेही वाचा –

कोरोना Antigen Test विना परराज्यातील शेकडो कुटुंबे ठाण्यात!

First Published on: October 8, 2020 10:59 PM
Exit mobile version