लिंबू-टिंबू आणि वर्षा भावे

लिंबू-टिंबू आणि वर्षा भावे

varsha bhave

रिअ‍ॅलिटी शोमुळे बालकलाकारांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे. नृत्य, मिमिक्री यांच्याबरोबर अवघड अशी गायनकलाही आत्मसात करणे वाढलेले आहे. या बाल गायक कलाकारांना प्रशिक्षण देणार्‍या गायक, संगीतकार वर्षा भावे यांनी बच्चे मंडळींसाठी ‘लिंबू-टिंबू’ हा अभिनव उपक्रम स्पर्धेच्या माध्यमातून राबवण्याचे ठरवलेले आहे. या कामी त्या स्वत: गुंतलेल्या आहेतच. परंतु, कौशल इनामदार, कमलेश भडकमकर, निलेश मोहरीर, सोनाली खरे, शमिका भिडे, शरयू दाते हे सेलिब्रिटी गायकसुद्धा सहभागी झालेले आहेत.

वर्षा भावे यांना संगीत नाटकाचा वारसा लाभलेला असला तरी ठरावीक वयापर्यंत त्यांनी आपल्या अभिनयातून, गायकीतून तो जपलेला आहे. नंतरच्या काळात मात्र बालकलाकारांसाठी काही करावे या इच्छेने ‘कलांगण’ या संस्थेची स्थापना केली आणि त्यातून अनेक बालकलाकारांनी गायनाचे शिक्षण देणे सुरू केले. आज त्यांना स्वत:ला अभिमान वाटावा असा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे. हिंदी, मराठी या वाहिन्यांवर गाण्याच्या संदर्भात जेवढे म्हणून रिऍलिटी शो होतात त्यात त्यांचा एकतरी विद्यार्थी सहभागी झालेला असतो. संपूर्ण महाराष्ट्रातून रिअ‍ॅलिटी शोमध्ये जे बालकलाकार सहभागी होतात, त्यांनासुद्धा मार्गदर्शन करण्याची जबाबदारी भावेंवर सोपवली जाते.

रिअ‍ॅलिटी शोपासून अलिप्त असणार्‍या परंतु काही करू इच्छिणार्‍या बालगायकांसाठी त्यांनी ‘लिंबू टिंबू’ बालगीत स्पर्धा आयोजित केलेली आहे. अंतिम स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. प्रत्येक केंद्रातून निवड झालेल्या प्रथम क्रमांकाच्या गायकाला बक्षीस तर दिले जाणार आहेच, परंतु पहिल्या दोन स्पर्धकांचे ध्वनीमुद्रीत केलेले गीत बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. भावेंचे मार्गदर्शन, सेलिब्रिटी गायक कलाकारांचा सहभाग आणि प्रत्यक्ष सादरीकरणासाठी व्यासपीठ हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. आपल्यालासुद्धा यात सहभागी होता येईल.
कलांगण – ९५९४९६२५८७

First Published on: December 10, 2018 5:06 AM
Exit mobile version