आता गोविंदा थिरकणार ‘या’ नवीन गाण्यावर!

आता गोविंदा थिरकणार ‘या’ नवीन गाण्यावर!

आता गोविंदा थिरकणार या नवीन गाण्यावर

श्रावण सुरू झाला म्हणजे महाराष्ट्रात सणांची अक्षरश: रेलचेल असते. मंगळागौर हा जसा महिला वर्गाचा आवडता सण आहे, त्याचप्रमाणे दहीहंडी हा तरूण मंडळींचा आवडता सण आहे. या दिवशी गोविंदा मोठ्या उत्साहात दंहीहंडी फोडतात. पण त्यांच्या अंगात खरा उत्साह संचारतो तो त्यावेळी सुरू असणाऱ्या गोविंदाच्या गाण्याने! ‘आला रे आला गोविंदा आला’, ‘बोल बंजरंग बली की जय’, ’मच गया शोर सारी नगरी रे’ या गाण्यांच्या बोलाने आणि ठेक्याने गोविंदा सरसर थर चढतो आणि दहिहंडी फोडतो. यावर्षी या गाण्यांमध्ये आणखी एका नवीन गाण्याची भर पडली आहे.

‘लोण्याचा लुटाया गोळा, आला रे हा गोविंदा आला’ असं म्हणत संदीप कुलकर्णी, ह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशर धम्माल करणार आहेत! या नवीन गाण्यामुळे गोविंदांच्या उत्साहात आणखी भर पडणार आहे. या गाण्यातून संदीप कुलकर्णी यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांसमोर येणार आहे.

संदीप कुलकर्णी यांच्या आगामी चित्रपटातील हे गाणं आहे. नुकतंच हे धम्माल गाणं लॉंच करण्यात आलं आहे. या गाण्यामधून संदीप कुलकर्णी, ह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या मिश्कील हावभावांनी गाण्याची मजा आणखी वाढवली आहे. हे गाणं शैलेंद्र बर्वे यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर चंद्रशेखर सानेकर यांनी शब्दबध्द केलं आहे.

चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात!

गोविंदांना थिरकायला भाग पाडणारं हे गाणं कोणत्या चित्रपटातील आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र संदीप कुलकर्णी, ह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या प्रमुख भुमिका या गाण्यात असतील हे या गाण्यावरून समजतंय.

 

First Published on: September 2, 2018 1:22 PM
Exit mobile version