कॅप्टन कूल धोनीचा पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त….

कॅप्टन कूल धोनीचा पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त….

धोनी द अनटोल्ड स्टोरी

भारतामध्ये जिकती क्रेझ क्रिकेटची आहे तितकीच क्रेझ आहे ती भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची. त्यामुळंच २०१६ मध्ये धोनीवर ‘धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट बनला होता. यामध्ये सुशांत सिंह राजपूतनं धोनीची भूमिका साकारली होती आणि हा चित्रपट लोकांना खूपच आवडला होता. त्यामुळं धोनीच्या चाहत्यांसाठी आता एक खूषखबर आहे. ती म्हणजे, या चित्रपटाचा सिक्वल बनवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पुढच्या भागात धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्यानंतरची कहाणी दाखवण्यात येणार आहे.

महेंद्रसिंगचं व्यक्तिगत आयुष्यही दाखवणार

महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट करिअरशिवाय या चित्रपटामध्ये त्याच्या व्यक्तिगत आयुष्याच्या घटनादेखील दाखवण्यात येणार आहेत. इंग्रजी वृत्तपत्र ‘मिड डे’नं दिलेल्या वृत्तानुसार, या सिक्वलमध्ये यावर्षी आयपीएलमध्ये धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये चेन्नई सुपर किंग्जनं मिळवलेलं यशदेखील दाखवलं जाऊ शकतं. इतकंच नाही तर, २०१५ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सेमीफायनलपर्यंत कशी पोचली याचा प्रवासदेखील दाखवण्यात येणार आहे. धोनी म्हणून या सिक्वलमध्ये सुशांत सिंह राजपूतची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ही बातमी ऐकून धोनीच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल.

पुढच्या वर्षी चित्रीकरणाची सुरुवात?

पुढच्या वर्षी निर्माता रोनी स्क्रूवालाच्या आरएसव्हीपी फिल्म्स बॅनरअन्वये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २०१६ मध्ये ‘धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन नीरज पांडेनं केलं होतं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिस चांगली कमाई केली होती. सिक्वलमध्ये सुशांत सिंह राजपूत बरोबर अन्य कोणते कलाकार दिसणार याची उत्सुकता आता चाहत्यांमध्ये वाढेल.

First Published on: July 4, 2018 12:36 PM
Exit mobile version