Madhubala Birth Anniversary: नऊ वर्ष अंथरुणाला खिळून होती मधुबाला, नाका तोंडातून व्हायचा रक्तस्त्राव

बॉलीवूडची आरस्पानी सौंदर्य लाभलेली अभिनेत्री मधुबाला (Madhubala) हीचा आज वाढदिवस आहे. त्याकाळी हिंदी चित्रपटसृ्ष्टी म्हणजे मधुबाला अशी तिची ओळख होती. मधुबालाचे खरे नाव होते. मुमताज जहा देहलवी (Mumtaz Jahan Dehlvi).तिच्या वडिलांचे नाव होते अताउल्लाह आणि आईचे नाव आयशा बेगम. मधुबालाने मुगल ए आजमसह तब्बल ७० चित्रपटात काम केले. मधुबाला ही सौंदर्य आणि अफलातून अभिनय याच मूर्तीमंत उदाहरण होती. तिचे जेवढे पडद्याबाहेर चाहते होते. त्यापेक्षा अनेक पटीने मधुबालावर फिदा तिचे सहकलाकार होते. त्याकाळी मधुबाला ही  हिंदी चित्रपटसृष्टीतील अशी एकमेव अभिनेत्री होती जिची चर्चा बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडमध्येही व्हायची. आपल्या चित्रपटसृष्टीतील कार्यकीर्दीत मधुबालाने अशोक कुमार, रहमान, दिलीपकुमार, देवानंद यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले होते.

 

मधुबालाच्या सौंदर्याची जेवढी चर्चा व्हायची तेवढीच चर्चा तिच्या प्रेमसंबंधाबद्दलही व्हायची. मधुबाला आणि दिलीप कुमार ९ वर्ष प्रेमसंबंधात होते. पण या नात्याला नाव देण्याच्या आधीच ते विभक्त झाले.

नियतीच्या मनात वेगळेच काही होते. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच मधुबालाला विविध आजारांनी घेरले. तिचं सौंदर्य ढासळू लागले. यामुळे तिला चित्रपट मिळेनासे झाले. एकेकाळी जिच्या नावावरून बॉलीवूड ओळखले जायचे ती मधुबाला अचानक चित्रपटसृष्टीच्या बाहेर फेकली गेली. निर्मात्यांच्या,चाहत्यांच्या, गराड्यात असलेली मधुबाला एकाकी पडली. मधुबालाच्या हृद्यात छेद होते. याशिवाय गरजेपेक्षा जास्त रक्त तिच्या शरीरात तयार होऊ लागले होते. जे कधी तिच्या नाका, तोंडातून बाहेर यायचे. पण तिने याबद्दल कधीच कोणाला काही सांगितले नाही. नऊ वर्ष मधुबाला याआजाराशी झुंज देत होती.

 

याचदरम्यान, तिने प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. किशोर कुमार विवाहीत होते. पण मधुबालाच्या सौंदर्याच्या कैफात ते आकंठ बुडाले होते. तिच्या आजारपणाबद्दल त्यांना पूर्ण माहिती देण्यात आली नव्हती. किशोर कुमार आपल्याला सोडून जातील या भीतीने मधुबालाने तिच्या आजाराची पूर्ण माहिती किशोर कुमार यांच्यापासून लपवली होती.

सगळे नीट सुरू असतानाच मधुबालाला पुन्हा अचानक नाका तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला. ते बघून किशोर कुमार यांना धक्का बसला. पण तरीही ते तिच्यासोबत होते. पण नंतर मात्र किशोर कुमार मधुबालाच्या सततच्या आजारपणाला कंटाळले आणि सतत कामाचे निमित्त करत घराबाहेर राहू लागले. यामुळे मधुबाला मनाने अधिकच खचली. तिचे आजारपण वाढले.

आयुष्यातील शेवटचे नऊ वर्ष मधुबालाने एकटेपणात काढले. यादिवसात तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी काही ठराविक लोकंच तिच्याकडे यायचे. यात दिलीप कुमार यांचाही समावेश होता. परिस्थितीमुळे दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले होते. त्यानंतर दिलीप कुमार यांनी लग्नही केले. तर दिलीप कुमार यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर मधुबालाने काही वर्ष एकटेपणात घालवली. यादरम्यान किशोर कुमार तिच्याजवळ आले होते. दोघांनी लग्नही केल. पण नंतर त्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली.

किशोर कुमार यांनी पाठ दाखवल्यानंतर  मधुबालाचा आजारही बळावला होता. डॉक्टरांनी ती जास्त जगू शकत नाही असे सांगितले होते. पण तरीही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मधुबालाने आजाराशी नऊ वर्ष झुंज दिली. त्यानंतर अवघ्या ३६ व्या वर्षी २३ फेब्रुवारी १९६९ रोजी सौंदर्यवर्ती मधुबालाने जगाचा निरोप घेतला.

 

 

 

First Published on: February 14, 2022 3:55 PM
Exit mobile version