‘इर्सल’ चित्रपटातून पाहायला मिळणार माधुरी पवारची ठसकेदार लावणी

‘इर्सल’ चित्रपटातून पाहायला मिळणार माधुरी पवारची ठसकेदार लावणी

आपल्या दिलखेचक अदांनी महाराष्ट्राला वेडं लावणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार ‘या बया दाजी आलं’ म्हणतं चाहत्यांना घायाळ करायला सज्ज झाली आहे. भलरी प्रॉडक्शन्स निर्मित, राज फिल्म्स प्रस्तुत आगामी बहुचर्चित ”इर्सल’ या मराठी चित्रपटात माधुरी पवारची ही नखरेल अदाकारी बघायला मिळणार आहे. ‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘इर्सल’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार यांनी केले आहे.

‘या बया दाजी आलं’ या गाण्याबद्दल बोलताना गीत, संगीतकार दिनकर शिर्के म्हणाले, ‘या बया दाजी आलं’ ही लावणी मला एका प्रवासादरम्यान सुचली, एका टमटमच्या मागे हे वाक्य लिहिलेलं होतं, एका छोट्या मुलीने ते वाचलं आणि सारखं गुणगुणतं होती त्यातून ही लावणी घडली, उर्मिला धनगर यांनी आपल्या खास शैलीत स्वरबद्ध केली असून, नृत्य दिग्दर्शक धैर्यशील उत्तेकर आणि एक्सप्रेशन क्वीन माधुरी पवारने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. चित्रपटात आणखी चार गाणी असून, प्रत्येकाचा बाज वेगळ्या धाटणीचा असल्याने ‘इर्सल’ ची गाणी प्रेक्षकांना भावतील, असा विश्वास आहे.

दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार म्हणाले, आतापर्यंत राजकारणावर अनेक चित्रपट, नाटकं आली आहेत. बर्‍याचदा त्यातील मांडणी खूप वरच्या स्तरातील असते. ‘इर्सल’ हा सिनेमा एकदम खालच्या फळीतील राजकारण आणि त्यातून प्रत्यक्ष घडणार्‍या घटनांमागील घटनांचा पर्दाफाश करतो.’इर्सल’चे निर्माते विनायक आनंदराव माने आहेत, तर विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही फ्रेश जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

‘इर्सल’ चित्रपटाची कथा अनिकेत बोंद्रे यांची असून, पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची आहे. संवाद विश्वास सुतार यांचे आहेत. ‘इर्सल’चे छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे. बहुचर्चित ‘इर्सल’ येत्या 3 जून 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :‘कठपुतली कॉलनी’तून उलगडणार प्रत्येक माणसाची गोष्ट !

First Published on: May 6, 2022 12:17 PM
Exit mobile version