‘हुकूमशाह टास्क’वर रंगणार ‘विकेन्ड चा डाव’!

‘हुकूमशाह टास्क’वर रंगणार ‘विकेन्ड चा डाव’!

हुकूमशाही टास्क (सौजन्य - वूट)

मराठी बिग बॉसची वाटचाल अंतिम टप्प्याच्या दिशेने सुरू झाली आहे. २२ जुलै रोजी पहिल्या ‘मराठी बिग बॉस’चा विजेता ठरणार आहे. मराठीतील १५ सेलिब्रिटींसोबत सुरू झालेल्या बिग बॉसचा खेळातील केवळ ३० दिवसच शिल्लक राहीले आहेत. आज बिग बॉसमध्ये ‘विकेन्डचा डाव’ रंगणार आहे. या आठवड्यात बिग बॉसने ‘दि ग्रेट डिक्टेटर’ हा टास्क घरातील सदस्यांवर सोपवला होता. मात्र डिक्टेटर बनलेल्या नंदकिशोरने प्रजेला दिलेल्या अपमानास्पद कार्यांवर सोशल मीडियातून चांगलीच टिका झाली. त्यामुळे निवेदक महेश मांजरेकर आज स्पर्धकांची कशी खरडपट्टी काढणार याकडे लक्ष राहील.

टास्कमध्ये नंदकिशोर चौघुले हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा बनली होती. या हुकूमशाही विरोधात बंड पुकारत प्रजेने हुकूमशाही मोडून काढली आणि टास्कमध्ये विजय मिळवला.

टास्कचा वाद सोशल मीडियावर

‘हुकूमशाह’ नंदकिशोर चौगुले यांनी प्रजेला दिलेल्या वागणूकीबद्दल सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. शर्मिष्ठाला मसाज करायला लावणं, पुष्करला अकारण शिक्षा देणं, सईला अनिश्चित काळासाठी नृत्य करायला लावणं या गोष्टी प्रेक्षकांना खटकल्या. नंदकिशोर यांनी वेगळ्या प्रकारे टास्क हँडल करायला हवा होता, असे मत प्रेक्षकांनी मांडले. त्यामुळे विकेंडच्या डावमध्ये महेश मांजरेकर या झाल्याप्रकाराबद्दल नंदकिशोर यांची शाळा घेणार हे बघणं उत्सुकतेचं आहे.

अखेर रेशम बनली ‘कॅप्टन’

रेशम टिपणीस

सदस्यांच्या एकमताने नंदकिशोर, रेशम आणि सई हे तिघे या आठवड्याच्या कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी उभे होते. घरामध्ये कॅप्टन्सीच्या पदासाठी ‘चाल – वाटचाल’ हा कॅप्टनसी टास्क रंगला. या टास्कमध्ये मेघा आणि सईचा रेशमसोबत वाद झाला. नंदकिशोर यांनी टास्कमधून काही शारीरिक कारणास्तव माघार घेतली. सई आणि रेशममध्येच हा टास्क रंगला. टास्कच्या दरम्यान सईच्या नकळत रेशम, सईचे अर्धे पाउल शूज मधून काढण्यात यशस्वी ठरली आणि रेशम या टास्कमध्ये विजयी ठरत बिग बॉस मराठीच्या घरात अखेर कॅप्टन बनली.

का झाले ‘बेस्ट फ्रेन्डस्’ नाराज

मेघा, पुष्कर आणि सई

मेघा, पुष्कर, सई आणि शर्मिष्ठा यांच्यामध्ये काल झालेल्या टास्कवरून थोडी नाराजी पाहायला मिळणार आहे. नक्की काय आहे नाराजीचे कारण ते आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

First Published on: June 23, 2018 3:12 PM
Exit mobile version