Marathi drama : पहिल्या एंट्रीला काळीज धडधडत होते – अरुण कदम

Marathi drama : पहिल्या एंट्रीला काळीज धडधडत होते – अरुण कदम

मुंबई : मालवणी भाषेतील गाजलेल्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या माध्यमातून मच्छिंद्र कांबळी यांचे व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पदार्पण झाले. या नाटकाने अक्षरश: धुमाकूळ घातला. केवळ कोकणातीलच नव्हे तर, सर्वच नाट्यरसिकांनी या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला. या नाटकात मच्छिंद्र कांबळी यांनी ‘तात्या सरपंच’ ही मुख्य भूमिका साकारली. आता हेच नाटक पु्न्हा एकदा रंगभूमीवर आले आहे. या नाटकात ‘हास्यजत्रा’फेम अरुण कदम एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

अल्फा गौरव कार्यक्रमात मच्छिंद्र कांबळी यांच्याबरोबर मी वस्त्रहरण नाटकाचा एक प्रवेश सादर केला होता. त्यात अनेक सेलिब्रिटी होती. त्यावेळी विजय चव्हाण, विजय पाटकर, दिगंबर नाईक आणि मी बाबूजी तथा मच्छिंद्र कांबळी यांच्याशी व्हॅनिटीत गप्पा मारत बसलो होतो. ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकातील माझे काम त्यांनी पाहिले होते आणि त्यांच्याबरोबर एक मालिकाही केली होती. त्यामुळे ते तेव्हा म्हणाले की, तुला घेऊन मला नाटक करायचे आहे. पण नंतर ते आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या नाटकात काम करण्याची इच्छा तेव्हा अपूर्ण राहिली, असे अरुण कदम सांगतात.

ही गोष्ट कायम माझ्या मनात राहिली. जेव्हा जेव्हा सेलिब्रिटींचा सहभाग असलेले वस्त्रहरण नाटक रंगभूमीवर यायचे, मला त्याची माहिती मिळाल्यावर मी प्रसाद कांबळी यांना फोन करत असे. पण प्रसाद कांबळी म्हणायचे, ‘अरुण यावेळी उशीर झाला, सर्व पात्र निश्चित झाले आहेत.’ हे ऐकून माझा हिरमोड व्हायचा. पण यावेळी मात्र प्रसाद कांबळी यांनी स्वत:हून मला फोन केला आणि या नाटकात काम करण्यासाठी बोलावले. अशा प्रकारे माझी इच्छा पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.

तब्बल 20 – 22 वर्षांनी मी पुन्हा रंगभूमीवर काम करत आहे. गडकरी रंगायतनमध्ये 27 एप्रिलला पहिला प्रयोग झाला. नाट्यगृह फुल्ल होते. खूप चांगला प्रतिसाद होता. हास्य जत्रेवर लोक प्रेम करतच आहेत, या नाटकालाही तशीच दाद मिळाली. माझ्या प्रवेशाच्यावेळी टाळ्या-शिट्ट्या मिळाल्या. अनेक लोक मला भेटायलाही आली, माझ्याबरोबर फोटो काढले. हा माझ्यासाठी आनंद वेगळाच आहे. त्यातही बाबूजींचे शब्द वास्तवात आले, याचा जास्त आनंद आहे. वस्त्रहरणच्या निमित्ताने पुन्हा एकदा रंगमंचावर काम करण्याची संधी प्रसाद कांबळी यांनी दिली, याबद्दल अरुण कदम यांनी आभार मानले.

मी या नाटकात शकुनी मामाची भूमिका करत आहे. इतकी वर्ष या इंडस्ट्रीत काम करून सुद्धा पहिल्या एंट्रीला माझे काळीज धडधड करत होते. पण प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्ट्या आणि लाफ्टर आल्यावर ताण कमी झाला. मग सगळे सोपे झाले. या नाटकाचा पहिला प्रयोग बघायला माझा नातू, माझी मुलगी, जावई, तिचे सासू-सासरे आले होते, असे त्यांनी सांगितले.


Edited by Manoj S. Joshi

First Published on: April 30, 2024 4:44 PM
Exit mobile version