Movie Review : दिग्दर्शनात गंडलेला,कथेने तरलेला – मिस यू मिस्टर

Movie Review : दिग्दर्शनात गंडलेला,कथेने तरलेला – मिस यू मिस्टर

सध्या धावपळीच्या जीवनात अनेकदा जोडप्यांना कठीण निर्णय घ्यावे लागतात. अनेकदा हे निर्णय त्यांच्या वैवाहिक आयुष्यात त्रासदायक ठरू शकतात. या निर्णयांमुळे अनेकवेळा जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. मात्र परिस्थिती त्यांना हे निर्णय घ्यायला भाग पाडतात. या सगळ्यातून अनेकवेळा जोडपी मार्ग काढतात पण अनेकदा त्यांना हे जमत नाही, अशाच एका जोडप्याची गोष्ट सांगणारा ‘मिस यू मिस्टर’ हा चित्रपट. वेगळी कथा, उत्तम अभिनय यामुळे चित्रपट प्रेक्षकांना आवडेल यात शंकाच नाही. मात्र दिग्दर्शकाची पकड सिनेमावरून सैल झालेली आहे. या जोडप्यांमध्ये पडत जाणारे अंतर दाखवण्यापर्यंतच कथा घुटमळ राहते. त्यामुळे सर्वसामान्य जोडप्यांना पडणारे प्रश्न चित्रपटात कायम राहतात.

चित्रपटात कावेरी (मृण्मयी देशपांडे) आणि तिचा नवरा वरूण (सिध्दार्थ चांदेकर) हे नवीन लग्न झालेलं जोडपं आहे. लग्नानंतर या दोघांना आर्थिक परिस्थितीमुळे एक निर्णय घ्यावा लागतो. पैसे मिळवण्यासाठी वरूणला १८ महिन्यांसाठी लंडनला जावे लागते. त्यामुळे लग्नानंतर १८ वेगळं राहण्याचा निर्णय घेतात. सुरूवातीला सगळ सुरळीत सुरू असताना त्यांच्यात वाढत जाणारं अंतर त्यांच्यात हळूहळू तणाव निर्माण करतं. सहा महिन्यांनतर वरूण पुन्हा भारतात येतो. भारतात परत आल्यावर तो कावेरीला आणखी दोन वर्ष लंडनला रहावे लागणार आहे असे सांगतो. हे कावेरीला समजल्यावर त्यांच्यातला ताण आणखी वाढत जातो. यामुळे कावेरी घर सोडून जाते. नवीन ऑफस घेण्याचे या दोघांचे स्वप्न असते. एककीकडे पैशाची जुळवाजुळव करणारा वरूण कावेरी घर सोडून गेल्यामुळे दुहेरी पेचात अडकतो. एकीकडे कावेरीला घरी आणण्यासाठी त्याची धडपड सुरू होते तर दुसरीकडे ऑफिस घेण्यासाठी वरूणची धडपड सुरू होते. आता कावेरी घरी परत येणार का? वरूण-कावेरी नवीन ऑफीस घेणार का? दोन वर्ष वरूणबरोबर कावेरी लंडनला जाणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतरच मिळणार आहेत.

या चित्रपटाची कथा खूप वेगळी आणि आजच्या सद्य परिस्थितीशी संबंधित आहे. जे नवरा बायको एकमेकांपासून कामानिमित्ताने लांब राहतात त्याच्यासाठी आणि जे नवविवाहित जोडपं आहे अशा सर्वांसाठी हा सिनेमा आहे. सध्या अनेक कावेरी आणि वरूण समाजात आहेत. त्यामुळे हे दोघेही आपल्यातले वाटतात. या चित्रपटाशी प्रेक्षक समरस होऊ शकतो. सिनेमातील गाणी वैभव जोशीने लिहीली असून संगीत आलाप देसाई यांनी दिलं आहे. सिनेमातील गाणी मात्र अतिशय सुरेल झाली आहेत. चित्रपटातील ‘तुझी आठवण’ हे गाणं तुम्ही चित्रपट संपल्यानंतरही गुणगुणत राहता.
सिध्दार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे या दोनही प्रमुख कलाकारांनी वरूण आणि कावेरीच्या भूमिका सुंदर वठवल्या आहेत. या दोघांनीही आपल्या आभिनयाच्या जोरावर चित्रपट पेलला आहे.वरूणच्या आई ,बाबांच्या भूमिकेत राजन भिसे आणि सविता प्रभूणे आणि कावेरीच्या आई बाबांच्या भूमिकेत असलेल्या अविनाश नारकर आणि राधिका विद्यासागर यांची उत्तम साथ या दोघांना मिळाली आहे. दिप्ती लेलेने कावेरीच्या बहिणीच्या भूमिकेत चांगली निभावली आहे. मात्र पाहुण्या भूमिकेत असलेल्या ऋषिकेश जोशीची भूमिका संपूर्णपणे फसली आहे. मुळात ही भूमिका आण्यामागचा उद्देशच स्पष्ट होत नाही.

चित्रपटाने मध्यंतरानंतर चांगला वेग घेतला आहे. अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला चित्रपट संपला तरी समजत नाही. चित्रपटाची कथा जरी उत्तम असली तर ती योग्य पध्दतीने प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात दिग्दर्शक कमी पडला आहे. नेमक्या या परिस्थितीत कसा मार्ग काढावा हेच स्पष्ट होत नाही.लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिपनंतर एकत्र आल्यावर जी भांडणं होतात त्या दुराव्याचं निरसन होताना सिनेमात घडणाऱ्या घटना अनाकलनीय आहेत. मात्र असे असले तरी एकदा चित्रपट बघायला काहीच हरकत नाही.

First Published on: June 28, 2019 1:33 PM
Exit mobile version