‘जेराल्ड्स गेम’ : सायकॉलॉजिकल खेळ

‘जेराल्ड्स गेम’ : सायकॉलॉजिकल खेळ

‘जेराल्ड्स गेम’ हा काही रूढ अर्थाने सर्व्हायव्हल ड्रामा प्रकारातील चित्रपट नाही. असे असले तरी त्याची मूळ संकल्पना त्याच धर्तीची आहे. शिवाय तसं पाहायला गेल्यास बहुतांशी सर्व्हायव्हल ड्रामा प्रकारातील चित्रपट जसजसे पुढे जाऊ लागतात तसे पात्रांच्या मानसिकतेवर होणार्‍या परिणामांमुळे सायकॉलॉजिकल थ्रिलर बनू लागतात. मात्र ‘जेराल्ड्स गेम’ केवळ थ्रिलरपर्यंत न थांबता मुळातच हॉरर प्रकारात मोडणार्‍या स्टीफन किंगच्या कथेला ‘सिनेमॅटिकली’ रिच अशा दृकश्राव्य स्वरूपात अधिक परिणामकारकपणे समोर आणतो.

जेसी (कार्ला गुजिनो) आणि जेराल्ड (ब्रूस ग्रीनवुड) हे वयस्कर दाम्पत्य आपल्या रटाळ वैवाहिक जीवनात ‘थ्रिल’ म्हणून ‘बीडीएसएम’ तथा हार्ड कोअर सेक्स नामक प्रकार आजमावण्यासाठी अलाबामामधील आपल्या लेक हाऊसवर आलेलं आहे. सगळी तयारी झालेली आहे. जेराल्ड त्यांचं सामान अनपॅक करत असताना जेसी आधी नजरेस पडलेल्या एका कुत्र्याला मांसाचा तुकडा खायला घालते. जेराल्ड रोमँटिक मूडमध्ये येऊन तिला बोलवायला आल्यावर दोघं मागचा दरवाजा उघडा ठेऊन आतमध्ये परततात.‘बीडीएसएम’मध्ये जणू गरजेच्या असलेल्या हातकड्यांनी जेसीला पलंगाशी बांधून जेराल्ड व्हायग्राच्या गोळ्या खातो.

‘बीडीएसएम’मध्ये गरजेचे असलेले किंबहुना त्याला गरजेचे वाटणारे आणि रस असणारे प्रकार तिला मान्य नसल्याने ती त्याला हा प्रकार पुढे सुरु ठेवायला नकार देते. मग तिच्यावर नाराज होऊन तो तिला सोडवणार असतोच. नेमका त्याचक्षणी त्याला हृदयविकाराचा झटका येतो नि तो जमिनीवर कोसळतो. परिणामी त्याच्या या ‘सेक्स गेम’ला निराळेच, पूर्णतः अनपेक्षित रूप मिळते आणि सुरुवात होते ती जेसीच्या कसोटीच्या खेळाला.

सदर प्रकाराला अपेक्षित असलेल्या एकांतामुळे आधीच लेक हाऊसवर आलेल्या या जोडीने नोकरांना सुट्टी दिलेली आहे. आसपास कुठेही घरं नसल्याने आणि असली तरी इथे वास्तव्य करण्याचा सीझन नसल्याने तसंही कुणीच नसणार हेही स्पष्ट आहे. मग या गोष्टींचा आणि आताच घडलेल्या घटनेचा विचार करता जेसी आता पुरती अडकलेली आहे. त्यामुळे तिला कुठल्याही मदतीची सोय होण्याचा मार्ग दिसेपर्यंत, जवळपास विना अन्न-पाण्याचं जिवंत रहावं लागणार आहे. मग तिच्याच सर्व्हाइव्ह होण्याचे (की न होण्याचे?) हे नाट्य.

‘जेराल्ड्स गेम’चं यश कशात असेल तर त्याच्या स्टायलिस्टिक हाताळणीमध्ये. कारण स्टीफन मूळ कथेच्या पातळीवर अनेक अ‍ॅब्सर्ड संकल्पना मांडतो. ज्यांना दरवेळी तितकेच परिणामकारक दृश्य स्वरूप दरवेळी मिळेलच अशातला भाग नाही. आता वर उल्लेख केलेल्या कथेत अ‍ॅब्सर्ड गोष्टी काय असतील किंवा कुठल्या असतील याची कल्पना करता येणं शक्य नाहीच. उदाहरणार्थ, जेसी आणि जेराल्ड या पात्रांचा सुरुवातीच्या काळात, जेराल्ड जिवंत असताना झाला नाही त्याहून अधिक विस्तार त्याच्या मृत्यूनंतर जेसीच्या रूपातून होत जातो. कारण सदर कालखंडात जेसी मानसिक पातळीवर इंडिव्हिज्युअली तिच्या आणि अगदी त्यांच्याही भूतकाळात खोलवर विचार करू लागते. ज्याचा सरळ संबंध सुटकेच्या पर्यायांच्या शोधापासून ते मुळात ते दोघेही इथे आलेच का याचाही पुनर्विचार करण्यापर्यंत सर्व पातळींवर आहे. यामुळे कुठलाही भाग ‘आऊट ऑफ प्लेस’ न वाटता कथेत आणि मुख्यतः जेसीच्या तग धरून राहण्याशी आहे.

हा चित्रपट अंगावर येणारी हिंसा, भय, मानसिक पातळीवरील संघर्ष, तणाव आणि भयाचे वैचित्र्यपूर्ण मिश्रण, गोअर सीन्स या सर्व गोष्टींच्या परिणामकारक अस्तित्त्वामुळे असह्य किंवा पाहायला तणावकारक आणि त्याहून अधिक म्हणजे अस्वस्थपूर्ण ठरू शकतो. मुळात यातच त्याचं यश दडलेलं आहे. कारण पाहण्यास सकारात्मकरित्या असह्य चित्रपट बनवणं निश्चितच कठीण आहे. यात तो दिग्दर्शकीय पातळीवर यशस्वी होतो. शिवाय त्याला कार्ला आणि ब्रूस हे

दोघेही कलाकार तितकंच वास्तव भासणारं वातावरण निर्माण करण्यात पुरेपूर साथ देतात. ज्यामुळे चित्रपटाला आवश्यक असणारी भावनिक आणि गुंतवणूक होणे शक्य होते.

बहुतांशी चित्रपट एकाच खोलीत घडत असल्याने त्या एकाच स्थळाच्या प्रत्येक कानाकोपर्‍याचा अधिकाधिक कल्पकतेने वापर करत, एका अंशापर्यंत एखादी गोष्ट नजरेत न आणता गरजेच्या क्षणी ती हायलाईट करणं, यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये दिग्दर्शक माइक फ्लॅनागन आणि छायाचित्रकार मायकल फिमोग्नारी या दोघांची तसेच एकूणच चित्रपटाची स्मार्टनेस दिसून येते. ‘जेराल्ड्स गेम’ ही अशी फिल्म आहे, जिचं तिचा प्रत्येक अस्पेक्ट योग्य प्रमाणात,
परिणामकारकरित्या हाताळण्याबाबत कौतुक करायला हवं.

First Published on: September 26, 2018 3:11 AM
Exit mobile version