‘मुळशी पॅटर्न’चा खतरररररनाक ट्रेलर!

‘मुळशी पॅटर्न’चा खतरररररनाक ट्रेलर!

मुळशी पॅटर्न

एका तालुक्याची नाही तर अख्ख्या देशाची गोष्ट ही टॅग लाईन घेऊन ‘मुळशी पॅटर्न’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या मराठी चित्रपटाचे पटकथा, लेखन, दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले असून मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, स्वतः प्रवीण तरडे यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारीत चित्रपटाचे कथानक असून येत्या २३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे, त्यामुळे शेती करून तोट्यात जाण्यापेक्षा जमीन विकून बक्कळ पैसा मिळवण्याचा हव्यास बाळगलेल्या तरुण पिढीवर ‘मुळशी पॅटर्न’ची कथा आधारलेली आहे. अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मुळशी पॅटर्न’ च्या ट्रेलरमुळे चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

पारितोषिक विजेता नाटकं

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत मानाची विविध पारितोषिक मिळललेल्या अनेक कलाकारांना मुळशी पॅटर्न चित्रपटात संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुळशी पॅटर्न हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटातील प्रसिद्ध ‘आरारारा’ गाण्यात अमोल शिंदे आणि विठ्ठल शेलार या दोन गुन्हेगारांचा समावेश करण्यात आल्यानं वाद निर्माण झाला होता. मात्र त्यांना गाण्यात घेण्यामागे काहीतरी कारण आहे हे चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येईल, असं प्रवीण तरडे यांनी याबाबत सांगितले होते.

आरारारा गाण्यात ओरिजनल गुन्ह 

या चित्रपटातील एका गाण्यात चक्क खरे गुन्हेगार झळकल्याने हा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटातील ‘आरारारा’ हे गाणं प्रदर्शित झालं आणि प्रदर्शनाच्या काही वेळातच सोशल मीडियावर ते हिट ठरलं. मात्र याच गाण्यात कुख्यात गुन्हेगार अमोल शिंदे आणि विठ्ठल शेलार झळकले होते. गाण्याच्या टीझरमध्ये राखाडी रंगाचा शर्ट घातलेला विठ्ठल शेलार दिसत असून त्याच्या पाठोपाठ केशरी शर्टमध्ये अमोल शिंदे दिसत आहे. विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथील मुळचा राहणारा असून मारणे टोळीसाठी वसुलीची जबाबदारी त्याच्याकडे आहे़. तशी पोलिसांकडे नोंददेखील आहे. त्यातून त्याने मुळशीत दोघांची हत्या केली असून खंडणीसाठी अपहरण करण्याचा गुन्हाही त्याच्या नावावर आहे. शहर पोलिसांनी त्याला एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याने मुळशी येथील दुहेरी खुनाची कबुली दिली होती़.

First Published on: November 16, 2018 1:09 PM
Exit mobile version