‘मुंबई पुणे मुंबई – ३’ ची तीन दिवसात ५ कोटींची कमाई

‘मुंबई पुणे मुंबई – ३’ ची तीन दिवसात ५ कोटींची कमाई

मुंबई पुणे मुंबई - ३

बहुचर्चित ‘मुंबई पुणे मुंबई-३’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून तो महाराष्ट्रात धुमधडाक्यात सुरु आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत तब्बल ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’च्या या तिसऱ्या भागालासुद्धा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडेंच्या या चित्रपटात स्वप्नील-मुक्ताने साकारलेल्या गौतम-गौरी यांच्या आयुष्यात पुढे काय घडते, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी करत आहेत. दमदार कथानक, कलाकारांचा कसदार अभिनय, उच्च निर्मितीमूल्ये यामुळे ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.

निर्मात्यांनी एकत्र आले पाहिजे

दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहे. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे आम्ही इथपर्यंत मजल मारली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ‘आशय चांगला असेल तर मराठी प्रेक्षक चित्रपट उचलून धरतो. हिंदी चित्रपटांपेक्षा आज आपण सरस ठरलो आहोत, याचे कारण हेच आहे. या यशाच्या आधारावर आपण पुढील वर्ष सुरक्षित करायला हवे. त्यासाठी सर्व निर्मात्यांनी एकत्र आले पाहिजे. चित्रपटांच्या तारिख एकत्र होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे असे देखील राजवाडे यांनी सांगितले.

सलग तिसऱ्यांदा स्वप्नील – मुक्ता एकत्र

तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा ‘मुंबई पुणे मुंबई’ ३ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. मराठीतील आघाडीची जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे सलग तिसऱ्यांदा दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याबरोबर एकत्र आले आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई -३ चित्रपटाची निर्मिती ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’च्या संजय छाब्रिया यांनी केली असून चित्रपटाचे सहनिर्माते ‘ ५२ फ्रायडे सिनेमाज’चे अमित भानुशाली आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई-३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांचे आहेत.

हेही वाचा – 

मुंबई-पुणे-मुंबई 3 सुपरहिट

First Published on: December 10, 2018 8:13 PM
Exit mobile version