प्रेक्षकांशी सहज जोडला गेलेला नाळ

प्रेक्षकांशी सहज जोडला गेलेला नाळ

Naal Marathi Movie

लहान मुलांच स्वत:च असं एक छोट विश्व असतं. ते आपल्या विश्वात रममाण असतात. आपल्या आजूबाजूला असणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा, त्यांच्या वागण्याचा परिणाम हा लहान मुलांवर होत असतो. लहान वयात आपल्या सगळ्यात जवळचे असतात ते आई- वडिल. पण जेव्हा ती आई आपली सख्खी आई नाही हे कळल्यावर आपली जी आवस्था होईल अगदी तशीच अवस्था चैतन्यची होते. पण चैतन्यची गोष्ट लेखक – दिग्दर्शक सुधाकर शेट्टी यांनी नेमकेपणाने प्रेक्षकांसमोर मांडली आहे. त्यामुळे ही गोष्ट केवळ चैतन्यची न राहता आपणही त्यात गुंतून जातो. आपल्या खर्‍या आईला भेटण्याच्या चैतन्यच्या प्रवासात न कळत आपणही सामिल होतो. आजपर्यंत नागराज मंजूळे दिग्दर्शीत सैराट आणि फॅण्ड्रीमधून या वास्तवादी प्रेमकथा अनुभवल्यानंतर ‘नाळ’ ही ग्रामीण जीवन शैलीची चैतन्यची कथा प्रेक्षकांना नक्की भावेल.

एका लहान खेड्यात ही कथा घडते. नदी काठी वसलेलं हे गाव जीथे दळणवळणाची साधनही फारशी नाहीयेत. चित्रपटाचा नायक चैतन्य (श्रीनिवास पोकळे) भोवती चित्रपटाची कथा घडते. चैतन्य त्याचे वडिल (नागराज मंजूळे), आई सुमन (देविका दफ्तरदार) आणि आजी (सेवा चव्हाण) यांच्यासोबत या लहान गावात रहात असतो. गावातल्या मुलांबरोबर दिवसभर नदीकाठी हुंदडणे,नगी पोहयला जाणे, कोंबड्यांच्या मागे फिरणे, गोठ्यात म्हशीसोबत खेळणे आणि गावापासून थोडं लांब असणार्‍या इंग्रजी शाळेत जाणे असा दिनक्रमच चैत्याचा असतो. चैत्याबरोबरच प्रेक्षही हा ग्रामीण जीवन मनोसोक्त जगतात. पण एकदिवशी गावात चैतन्यचा मामा (ओम भुतकर) येतो आणि चैतन्यचं आयुष्यच बदलतं. चैतन्यला मामा बोलता बोलता ही तूझी खरी आई नाही तर यांनी तुला दत्तक घेतलय असं सांगतो, आणि चैतन्यचा खर्‍या आईचा शोध सुरू होतो.

आपल्यावर प्रेम करणारी ही आई आपली नाही म्हटल्यावर चैतन्य अस्वस्थ होते. त्याची झालेली घालमेल दिग्दर्शकाने त्यांच्या बोलक्या डोळ्यातून सुंदर टिपली आहे. चैतन्यचा हळूहळू आपल्या आईकडे संशयाने बघायला लागतो. तीला आई म्हणणं ही बंद करतो. हीच आपली खरी आहे का हे बघण्यासाठी तीची परिक्षाही घेतो.चैतन्यचा आटापीटा सुरू होतो तो आपल्या मामाच्या गावी असणार्‍या खर्‍या आईला भेटण्याचा. चैतन्यचा त्याच्या खर्‍या आईला शोधण्याचा प्रवास म्हणजे ‘नाळ’. आता चैतन्यला त्याची खरी आई भेटणार का? आपल्यावर प्रेम करणारी दत्तक आई आणि जन्म देणारी आई या दोघींमध्ये कोणाचा स्वीकार चैतन्य करणार? त्याची नाळ कोणत्या आईशी जुळणार? हे कळण्यासाठी तुम्हाला नाळ बघावाच लागेल.

चित्रपटाच्या एकदी पहिल्या फ्रेमपासूनच चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यात नाळ यशस्वी ठरला आहे. चित्रपटाचा नायक चैतन्य हा चित्रपटाचा युएसपी आहे. नागराज मंजूळे जरी चित्रपटात असले तरी चैतू भाव खावून गेला आहे. चैतूचं लाडीक बोलणं, गोड हसणं, त्याचे बोलके डोळे अगदी चित्रपट संपल्यानंतरही तुमच्या डोळ्यासमोर राहतात. चित्रपटाचं संवाद लेखन नागराज मंजूळे यांनी केलं आहे. त्यामुळे वास्तवाचे भान सतत चित्रपटात जाणवत राहतं. देविका दफ्तरदार हीने चैत्याची आई उत्तम रेखाटली आहे. संपूर्ण चित्रपटात असणाऱा तीचा वावर अस्सल ग्रामीण भागातील वाटतो.

चित्रपाटचं संगीत हे चित्रपटाची जमेची बाजू आहे. ‘जाऊ दे ना वं..’ हे चित्रपटातील गोड गाणं तुमच्या कायम रेंगाळतं. त्याचबरोबर चित्रपटाचं पार्श्वसंगीतही उत्तम जमून आलं आहे. मध्यंतरा आधी चित्रपटपुर्णपणे प्रेक्षकांची पकड घेतो. मध्यंतरानंतर चित्रपट थोडा रंगाळतो पण चित्रपटाचा शेवटचा भाग पुन्हा एकदा तुमची मनं जिकंतो.

नाळ हा तुमच्या रोजच्या जिवनात घडणारी ग्रामीण टच असणारी गोष्ट आहे. सिनेमातील अनेक गोष्टी या लेखकाने प्रेक्षकांवर सोडल्या आहेत. ही एका लहानग्याची गोष्ट असली तरी मोठ्यानाही तितकच शिकवून जाते. प्रेक्षकांशी चित्रपटाच्या पहिल्या फ्रेम पासून जोडली गेलेली नाळ तुटणार नाही याची खबरदारी दिग्दर्शकाने घेतली आहे. त्यामुळे त्याला साजेल असाच चित्रपटाचा शेवट आहे. चित्रपटाच्या शेवट डोळ्यात आसू आणि ओठांवर हसू आणल्याशिवाय रहात नाही.

– संचिता ठोसर

First Published on: November 17, 2018 5:17 AM
Exit mobile version