थिएटरशी ‘नाळ’ तुटली, इंटरनेटवर लीक!

थिएटरशी ‘नाळ’ तुटली, इंटरनेटवर लीक!

'नाळ' चित्रपट

नागराज मंजुळेंचा बहुचर्चित चित्रपट ‘नाळ’ आता मोबाईलवर लीक झाला असून थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी खेचणाऱ्या नाळ चित्रपटाला ग्रहण लागले आहे. हा चित्रपट मोबाईलवर व्हायरल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला नाळ चित्रपट आता टोरंटवर उपलब्ध झाला असून त्या माध्यमातून सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. अतिशय क्लिअर अशा एचडी क्वॉलिटीत या चित्रपटाची प्रत लीक झाली आहे. त्यामुळे अवघ्या एका आठवड्यात प्रेक्षकांची भाऊगर्दी चित्रपटगृहात खेचणाऱ्या आणि १४ कोटींचा गल्ला जमवणाऱ्या नाळ चित्रपटाला यापुढे प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करतील का? अशी शंका निर्माण होत आहे. या आठवड्यात थिएटरमध्ये ‘मुळशी पॅटर्न’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’सोबत नाळची स्पर्धा होती. मात्र इंटरनेटवर लीक झाल्यामुळे चित्रपटाची या स्पर्धेशी नाळ तुटणार अशी भीती वर्तवण्यात येत आहे.

सैराटही झाला होता लीक

२०१६ साली प्रदर्शीत झालेला नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपटदेखील काही तासातच सोशल मीडियावर लीक झाला होता. या चित्रपटाने इतिहास रचला होता. सैराटच्या निमित्ताने पहिल्यांदा मराठी चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये दाखल झाला होता. मात्र, सोशल मीडियावर तातडीने लीक झाल्यामुळे सैराटच्या लोकप्रियतेत कोणतीही कमतरता झाली नव्हती. मोठ्या संख्येने या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली होती. पंरतू, पुन्हा एकदा नाळ चित्रपट लीक झाल्यामुळे निर्मात्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

First Published on: November 24, 2018 7:09 PM
Exit mobile version