वेडिंगचा शिनेमा चित्रपटात नवीन गायकांना संधी

वेडिंगचा शिनेमा चित्रपटात नवीन गायकांना संधी

वेडिंगचा शिनेमा

मराठी चित्रपटांमध्ये अनेकानेक प्रयोग गेल्या काही वर्षांमध्ये होत आले आहेत. पण संगीत दिग्दर्शक डॉ सलील कुलकर्णी यांच्या ‘वेडिंगचा शिनेमा’च्या टीमने केलेला हा प्रयोग मात्र खूप वेगळा आहे. या चित्रपटातील एक गाणे हे चक्क ऑनलाइन ऑडीशनच्या माध्यमातून गायकांची निवड करून ध्वनिमुद्रित केलं जाणार आहे. देश आणि परदेशातील गायकांकडून मिळालेल्या प्रतीसादानंतर तब्बल ४१२ गायक स्पर्धकांमधून दोन गायकांची निवड केली गेली. माजलगावचा सौरभ शिरसाठ आणि कोल्हापूरची स्वरूपा बर्वे यांची निवड या गाण्यासाठी केली गेली आहे.

वेडिंगच्या शिनेमाचे नवीन गायक

“कुनीबी कसंबी घालुदे पिंगा, बाशिंगाचा कळतोच इंगा…. कसा न कळला कधी न कळला, माझा बी जमलाय जोडा… माझ्या वेडिंगचा शिनेमा काढा…,” असे या गाण्याचे बोल आहेत. सलील कुलकर्णी यांनी हे गाण्याचे बोल सोशलमिडीयावर टाकले होते, आणि गाण्याचे व्हीडीओ अपलोड करायचं आवाहन नवीन गायकांना केलं. सलीलच्या उपक्रमाला केवळ देशातून नाही तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आणि स्वरूपा व सौरभ यांची निवड करत असल्याची घोषणा सलीलने केली. चित्रपटाची तीन गाणी याआधीच प्रकाशित करण्यात आली आहेत तर ध्वनीमुद्रित होणारे हे चौथे गाणे आहे.

 “हे गाणे ऑडीशनच्या माध्यमातून गावून घेण्याचे आमचे ठरल्यावर संदीप खरेनेही ते त्याचप्रकारे लिहिले आहे. गेल्या आठवड्यात फेसबुकच्या माध्यमातून मी आवाहन केल्यानंतर १३ ते १६ मार्च या चार दिवसांमध्ये या आवाहनाला भरभरून प्रतिसाद लाभला. आज आम्ही त्यातील विजेत्यांची घोषणा केली. मला खूप आनंद होतोय की माजलगावचा सौरभ आणि कोल्हापूरची स्वरूपा हे धमाल गाणे गाणार आहेत असं सलील या नवीन उपक्रमाबद्दल म्हणाला.

डॉ सलिल कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली. पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर आणि दोन गाणी नुकतीच प्रदर्शित झाली होती. शिवाजी साटम, अलका कुबल, मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर या आघाडीच्या कलाकारांबरोबरच भाऊ कदम, प्रवीण तरडे, हे कलाकारसुद्धा या चित्रपटात आहेत.

First Published on: March 19, 2019 4:58 PM
Exit mobile version