करोनामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे बबड्या घरातून बाहेर पडत नाही!

करोनामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे बबड्या घरातून बाहेर पडत नाही!

‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. या मालिकेतील बरेचसे चेहरे प्रेक्षकांच्या ओळखीचे आहेत. मात्र यात ‘सोहम’ ही व्यक्तीरेखा साकारणारा नवखा कलाकार आशुतोष पत्की हा प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. तर आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. सोहम म्हणजेच बबड्या याच्या वागण्याची चर्चा सगळीकडे आहे. एखाद्या खलनायकाची चीड यावी तितकी चीड प्रेक्षकांना बबड्याची येते. त्याला वठणीवर कसे आणावे याचे सल्ले प्रेक्षक सोशल मीडियावर त्यांच्या कॉमेंट्सच्या रूपाने देत असतात.

मालिकेत सोहमची भूमिका साकारल्यानंतर त्याच्या खासगी आयुष्यात काय बदल घडले, त्याला काय गमतीशीर अनुभव आले याबद्दल आशुतोष म्हणाला, “आता जेव्हा मी बाहेर पडतो तेव्हा लोक माझ्यावर प्रेम करतात हे पाहून खूप बरं वाटतं. पण कुठेतरी एखाद्या काकू येऊन मारतील की काय याचीही भीती वाटते. बाबांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा कुठे जातो तेव्हा कार्यक्रमाला आलेल्या काकू, आजी मला येऊन सांगतात, ‘अरे नको ना आईसोबत असा वागत जाऊस, किती त्रास देशील तिला..’ तर काही जण तर अगदी खोलात शिरत म्हणतात, ‘अरे अजूनही तुझा टॉवेल, कपडे आईच उचलून ठेवते, घडय़ा घालते. तिला जरा मदत करत जा’, हे जेव्हा ऐकतो तेव्हा लोकांची कमाल वाटते.

विशेष म्हणजे आभासी पात्रांविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा खूप काही सांगून जातो. यातला महत्त्वाचा प्रसंग म्हणजे, अनेक मुलं खऱ्या आयुष्यातही आईसोबत असेच वागत होते. ही मालिका पाहून त्यांनी स्वत:त परिवर्तन घडवलं आणि ते अनुभव त्यांनी समाजमाध्यमांमार्फत माझ्यापर्यंत पोहोचवले.’’

First Published on: March 17, 2020 12:23 PM
Exit mobile version