स्वराज्य इव्हेंटस साकारणार ‘शंभरपैकी पुल’

स्वराज्य इव्हेंटस साकारणार ‘शंभरपैकी पुल’

मराठी भाषेवर, साहित्यावर प्रेम करणार्‍या साहित्यप्रेमींसाठी यंदाचे वर्ष हे विशेष आहे. प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व बहुआयामी व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्षे 8 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या निमित्ताने स्वराज्य इव्हेंटसने ‘शंभरपैकी पु.ल’ या कार्यक्रमाचे आयोजन 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता टाऊन हॉल येथे केले आहे. रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

विनोदी लेखनाने सर्वश्रुत असलेल्या पु.ल यांनी तितकेच वैचारिक व गंभीर लेखन देखील केले आहे. त्यांनी लिहिलेले काही लेख, पत्र, भाषण यांचे अभिवाचन यावेळी करण्यात येणार आहे. पु.ल यांचे साहित्य रसिकांना माहितच आहे. परंतु साहित्य सोडून प्रसिध्द न झालेले साहित्य या कार्यक्रमात रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न स्वराज्य इव्हेंटसचा आहे. पु.लं.च्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली म्हणून आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सिनेदिग्दर्शक विजू माने, अभिनेते अभिजीत चव्हाण, सागर तळाशीकर, संगीतकार कौशल इनामदार सहभागी होणार आहेत. पुल यांच्या दुर्मिळ पत्राचे वाचन सुभाष जोशी करणार असून धनंजय म्हसकर, दुनिता कुणकवळेकर, कस्तुरी महेश, अमोल शिंदे हे गाणी सादर करणार आहेत. त्यांना सुशील गद्रे, कौस्तुभ दिवेकर, सुमीत जाधव साथसंगत करणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता पांडे करणार आहेत. तरी या कार्यक्रमास ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्वराज्य इव्हेंट्सतर्फे करण्यात आले आहे.

First Published on: November 3, 2018 12:49 AM
Exit mobile version