‘पाताल लोक’ – लॉकडाऊनमधला करमणुकीचा खजाना

‘पाताल लोक’ – लॉकडाऊनमधला करमणुकीचा खजाना

पाताल लोक - वेबसिरीज

“येह सिस्टीम है ना चौधरी, दूर से देखने से सडा हुआ कचरे का ढेर लगता है | लेकीन अंदर घूस के समझोगे ना; हर खुर्सी को मालूम है, उसे क्या करना है | और जिसको नई पता होता, उस खुर्सी को बदल दिया जाता है | लेकीन, ये सिस्टीम कभी नही बदलता |” हा डीसीपी भगत (विपिन शर्मा)चा डायलॉग म्हणजे पाताल लोक मध्ये होणाऱ्या सर्व घटनांचा परिपाक..

‘अनुष्का शर्मा प्रोडक्शन’ आणि ‘सुदीप शर्माचं दिग्दर्शन’ असलेली पाताल लोक १५ मे रोजी ‘अमेझॉन प्राईमवर रीलीज’ झाली. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच तरुण तेजपाल यांच्या पुस्तकावर आधारित असलेली हि वेब सिरीज आहे, असा ठपका ठेवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र लगेचच सुदीप शर्माने स्पष्टपणे याला नकार दिला.

वेब सिरीजचा काळ सुरु झाल्यापासून सेक्रेड गेम, मिर्झापूर यासारख्या थ्रिलर, ऍक्शन सारख्या सिरीजने प्रेक्षकांचे माईंड सेट करून करून ठेवले होते. साधारण एक ते दीड वर्षानंतर आलेली हि ‘पाताल लोक’ क्राईम, थ्रिल आणि वास्तवतेचा स्पर्श असलेली हि सिरीज जणू काही आपल्या आजूबाजूलाच या घटना घडत आहे असे वाटते.

सुदीप शर्माचं यापूर्वी ‘उडता पंजाब’ आणि ‘एन एच १०’ मध्ये असलेलं दिग्दर्शन आणि ‘पाताल लोक’ या वेब सिरीजचं दिग्दर्शन यात तुलना केल्यास ‘पाताल लोक’ कुठेतरी उजवी ठरते. दिग्दर्शनाला कलाकारांनी दिलेली साथ यामुळे हि वेब सिरीज नक्कीच भाव खाऊन जाते. जयदीप अहलावत, निरज कबी, अभिषेक बॅनर्जी, असिफ बासरा, निहीरिका दत्त, ईश्वाक सिंग यांसारख्या कलाकारांनी कथानकाला उत्तम साथ दिलेली आहे.

पाताल लोक या ९ एपिसोडच्या सिरीजच कथानक पूर्णपणे हाथिराम चौधरी (जयदीप अहलावत) या पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरत असते. हाथिरामच्या व्हॉटस्अप युनिव्हर्सिटीनुसार जगात तीन लोक आहेत. एक स्वर्गलोक जेथे पैशावाले राहतात. दुसरा जमीनलोक जिथे तो राहतो आणि तिसरा म्हणजे पाताल लोक जिथे त्याचे पोलीस स्टेशन येते. त्याच्या कार्यक्षेत्रात एका पुलावर चार गुन्हेगारांना अटक केली जाते. हे गुन्हेगार मीडियातील नावाजलेला चेहरा असलेल्या संजीव मेहरा (नीरज कबी)चा खून करण्यासाठी निघालेले असतात. हाय प्रोफाईल केसचा कोणताही अनुभव नसलेल्या हाथीयार कडे हि केस दिली जाते. हाथिराम सोबत ३ महिन्यापूर्वी पोलीस जॉईन केलेला अन्सारी (ईश्वाक सिंग) असतो. अन्सारीने नुकतीच आयएएस मेन्स क्लियर केलेली असते आणि आता तो मुलाखतीची तयारी करत असतो. त्याची हि पहिलीच केस असते आणि हाथिरामला भेटलेली पहिलीच हायप्रोफाईल केस त्यामुळे दोघेही रात्रंदिवस एक करून या केसचा छडा लावण्याचा मागे असतात.

हाथीयारवर पोलीस प्रशासनात स्वतःची चांगली इमेज बनविण्यासोबतच आपल्या कुटुंबियांच्या नजरेत देखील हिरो म्हणून राहायचे असते. त्याच दडपणाखाली तो आजपर्यंत काम करत असतो. गँग्ज ऑफ वासेपूर तसेच राझी मध्ये निभावलेली भूमिका आणि यामध्ये निभावलेली भूमिका यामुळे सगळ्याच भूमिकांमध्ये जयदीप चपखल बसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कुटुंबाची चिंता, वाढत्या वयात असलेल्या मुलाकडून काही चुका झाकण्याऐवजी तिथल्या तिथे दिलेले उत्तर यासोबतच कामाप्रती स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेलं असणं हे सर्व नैसर्गिकपणे त्याने चेहऱ्यावर दाखवले आहे.

एक चापट काय असते हा सीन दाखवताना महिला सक्षमीकरणाचा नारा दाखवला गेल्याने पाताल लोक बाबत खरं खुरं मांडण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो. परिणामी हा सीन भाव खाऊन जातो.

अभिजित बॅनर्जीने केलेली विशाल त्यागी उर्फ हातोडा त्यागी या व्हिलनची भूमिका कथानकाला एका उंचीवर नेऊन ठेवते. सिरीज अर्ध्यापर्यंत येते, तेव्हा वाटते कि केसचा उलगडा झाला, मात्र तेव्हाच कैदखान्यात अशी काही घटना घडते कि, त्यामुळे सगळे कथानक फिरते आणि शून्यावर येते.. हीच या कथानकाची जमेची बाजू म्हणावी लागेल. कारण प्रेक्षक जेव्हा पुढच्या सीनचे भाकीत मनात बांधत असतात तेव्हाच काहीतरी वेगळ घडून ते भाकीत शून्यावर येते; तेथे लेखक, दिग्दर्शक खऱ्या अर्थाने जिंकलेला असतो.

सिरीज जस जशी पुढे जाते तसं तसं नक्की केस का ? कशासाठी ? या गोष्टीचे उलगडे होत जातात तेव्हा मात्र प्रेक्षक पूर्णपणे पाताललोकामध्ये शिरलेला असतो; आणि आता तिथून बाहेर येणं त्याला शक्य नसतं.

क्राईम थ्रिलर, कास्टीझम, मॉब लिंचींग, प्रतिगामी, पुरोगामी, राजकारण, मिडिया, निवडणुका, बाबा बुवा अशा किती तरी बाबींचा एकत्रित धांडोळा घेऊन हि सिरीज बनवली गेली आहे; आणि या प्रत्येक बाबी कथानकाला एकदम चपखल बसविण्यात लेखकाला यश आलेले आहे.

शुटींग साठी वापरलेले सीन म्हणजे दिल्लीतील उच्चभ्रू वस्ती, कॉर्पोरेट एरिया, पंजाबमधील वस्ती आणि चित्रकुट. संवाद देखील घेताना प्रांतवार त्यात बदल केल्याने वास्तव चित्रण सामोर येते. अर्थातच याचमुळे सिरीजला जिवंतपणा आला आहे. संवादासोबत काही बोल्ड सीन, बेड सीन आणि शिवराळ भाषा अधूनमधून येते मात्र त्याचा नकारात्मक इफेक्ट कुठेही दिसून येत नाही. कथानकात मध्येच वास्तव, मध्येच फ्लॅशबॅक यामुळे बघताना देखील एक वेगळाच अनुभव येतो.

लेखन, संवाद, अभिनय, संगीत आणि दिग्दर्शन या साऱ्या घटकांवर जीव ओतून केलेले काम दिसून येते; परिणामी हि सिरीज लाजवाब म्हणावी लागते. शेवटी एकच… अगर आप कुत्तों से प्रेम करते हैं तो आप इंसान अच्छे हैं।


लेखक वैभव कातकाडे हे युवा ब्लॉगर असून विविध विषयावर ते लेखन करतात. 

First Published on: May 18, 2020 12:46 PM
Exit mobile version