निलेश साबळे, भाऊ आणि कुशल बद्रिके विरोधात पोलिसात तक्रार!

निलेश साबळे, भाऊ आणि कुशल बद्रिके विरोधात पोलिसात तक्रार!

निलेश साबळेचा माफीनामा

झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ९ मार्च रोजी झी मराठीच्या फेसबुक पेजवरून एक व्हिडिओ शेयर करण्यात आला होता, हाच व्हिडिओ वादाचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये भाऊ कदम आणि कुशल बद्रिके हे कलाकार अभिनय करताना दिसत होते. मात्र त्यांच्या हातात असलेल्या एका फोटो फ्रेममध्ये राजश्री शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड महाराज यांचे फोटोज् एडिट करून त्या जागी भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचे चेहरे लावल्याने या नव्या वादाला तोंड फुटले. याचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आणि सोशल मीडियावर याबद्दल चर्चा सुरु झाली. अनेकांनी या कृत्याचा निषेध करत नाराजी व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहता व्हिडिओ संबंधित पेजवरून हटवण्यात आला आहे.

संभाजीराजे भडकले

हे प्रकरण समजल्यावर खासदार संभाजीराजे भोसलेसुद्धा चांगलेच भडकले. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून या प्रकारचा तीव्र निषेध केला आहे. ‘लोकप्रियतेची हवा डोक्यात गेली की माणूस विक्षिप्त वागायला लागतो.’ असं म्हणत त्यांनी या प्रकरणाचा निषेध केला. तसेच निलेश साबळे, झी वाहिनी, या कार्यक्रमाचे दिग्दर्शक, निर्माते या सर्वांनी आपल्या गैरकृत्याची माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा दमही संभाजीराजेंनी दिला. त्याचप्रमाणे आमचे घराणे कलेचे आश्रयदाते आहे, परंतु याचा अर्थ असा नाही कि कुणीही काहीही करावं. अशा कडक शब्दात त्यांनी निषेध करत इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असं ते म्हणाले.

निलेश साबळेने मागितली माफी

संभाजी ब्रिगेडच्या पोस्टनंतर निलेश साबळे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत दिलगिरी व्यक्त केली. मात्र तरीही हे प्रकरण मिटले नाही. आता सोलापुरात निलेश साबळे, भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या तिघांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडने दाखल केली आहे.

First Published on: March 15, 2020 10:57 AM
Exit mobile version