प्रतिक बब्बरची ‘वेब’ दुनियेत एंट्री!

प्रतिक बब्बरची ‘वेब’ दुनियेत एंट्री!

ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. ‘जाने तू या जाने ना’, ‘एक दिवाना था’ अशा काही मोजक्याच हिंदी चित्रपटांमधून काम करणारा प्रतिक बब्बर, हिंदी चित्रपटसृष्टीत एक हिरो म्हणून फारसा नावारुपाला आला नाही. मात्र, तो स्वत:चा असा एक चाहता वर्ग निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. दरम्यान, प्रतिक बब्बर आता एका नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रतिकने ‘डिजिटल’ दुनियेमध्ये पाऊल ठेवले आहे. अॅमेझॉन प्राईमच्या ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ (Four more shots please) या आगामी व्हिडिओ सिरीजमधून प्रतिक ‘वेब’ दुनियेत डेब्यू करत आहे. प्रतिकला एका नव्या माध्यमात आणि नव्या रुपात पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असणार यात काहीच शंका नाही. ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ या वेबसिरीजचा ट्रेलर आणि टायटल ट्रॅक युट्यूबवर रिलीज झाले असून, सोशल मीडियावर लोकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

या वेब सिरीजमध्ये सयानी गुप्ता, कीर्ति कुलहारी, बानी जे, मानवी गगरू, प्रतिक बब्बर, लिजा रे, मिलिंद सोमण आणि नील भूपालम आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. Amazon प्राईमच्या या नव्या व्हिडिओमध्ये भारतात नोकरी, व्यवसाय करणाऱ्या चार महिलांची गोष्ट आणि त्यांच्यातील मैत्री यांचं चित्रण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या वेबसिरीजचं बहुतांशी तांत्रिक कामही महिलांनीच सांभाळलं आहे. अनु मेननने दिग्दर्शित केलेल्या ही सिरीज येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. एकाच दिवशी ही सिरीज २०० देशांमध्ये रिलीज होणार आहे.

First Published on: January 18, 2019 4:23 PM
Exit mobile version