‘सिम्बा’चा प्रमोशनचा मराठी फंडा

‘सिम्बा’चा प्रमोशनचा मराठी फंडा

सिम्बा चित्रपट

हिंदी चित्रपटात मराठी कलाकाराने काम करणे हा विषय आता तसा नवीन राहिलेला नाही. जुन्या चित्रपटात ज्या मराठी कलाकारांनी आपली मोहोर उमटवली तो त्यांच्या व्यवसायाचा एक भाग होता. पुढे अशा हिंदी चित्रपटांमध्ये आपलाही कलाकार म्हणून सहभाग असायला हवा यासाठी मराठी कलाकारांची धडपड ही असायची; पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. बॉलिवूडकरांना हिंदी चित्रपटात मराठी कलाकार असायलाच हवा असा आग्रह धरायला लागलेला आहे आणि मराठी कलाकारही ज्या उद्देशाने आपली निवड केली गेली तो उद्देशही खणखणीतपणे पडद्यावर दाखवत होते. आता या मराठी कलाकारांनी त्याहीपुढे उडी घेतलेली आहे. ती म्हणजे हे कलाकार यशाचे भागीदार झालेले आहेत. रोहित शेट्टीच्या बर्‍याचशा चित्रपटांत मराठी कलाकारांचा सहभाग हे त्याचे उत्तम उदाहरण सांगता येईल.

अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी चित्रपटाची फक्त निर्मिती केली नाही तर एकाने अभिनेता तर दुसर्‍याने दिग्दर्शन अशा जबाबदार्‍या उचलल्या. त्यांच्यात एकमत होण्याला या दोघांचे वडील हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये फाईट मास्टर म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. अजय देवगण यांच्या कार्यालयात क्रिएटिव्ह कामांसाठी मराठी माणसांचा भरणा अधिक आहे तर रोहित शेट्टीला मुळातच मराठी अशी पार्श्वभूमी आहे. रोहितचे वडील जग्गू शेट्टी यांचे बरेचसे वास्तव्य लालबाग-परळ भागात झालेले होते. मराठी कलाकारांना हिंदी चित्रपटात प्राधान्य दिल्याने प्रेक्षकवर्ग हा अधिक मिळतो हे ‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न’ या चित्रपटांनी पटवून दिलेले आहे. या दोन्ही चित्रपटांत मराठी कलाकार मोठ्या संख्येने होते.

सध्या चर्चा आहे रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ या चित्रपटाची. हिंदी चित्रपटात मराठी कलाकारांचा सहभाग असल्याने काय होऊ शकते ते रोहित शेट्टीने पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे. त्यामुळे याही चित्रपटात मराठी कलाकारांची यादीही मोठी आहे. हिंदीत फारसे चित्रपट न केलेल्या सिद्धार्थ जाधवचा या ‘सिम्बा’च्या सेटवर सर्व कलाकारांकडून वाढदिवस साजरा केला जातो. सोशल नेटवर्कवर त्याची चर्चा घडते ही ताकद फक्त सिद्धार्थमध्येच नाही तर यात सहभागी असलेल्या सर्वच कलाकारांमध्ये आहे. ‘सिम्बा’च्या प्रसिद्धीसाठी जी टीम कार्यरत आहे त्यांनी यातल्या मराठी कलाकारांना हाताशी घेऊन वेगळ्या प्रसिद्धीचे आयोजन केलेले आहे. पत्रकारांनी संपर्क साधला तर यातल्या मराठी कलाकारांशी थेट सुसंवाद साधता येईल, असे काहीसे सांगणे सुरू केलेले आहे. ज्यांच्या नावाला वलय आहे, कामाचा व्याप आहे अशा कलाकारांना पी आर टीमने गुलदस्त्यात ठेवलेले आहे. सुचित्रा बांदेकर, वैदेही परशुरामी, अश्विनी काळसेकर, नेहा महाजन, विजय पाटकर, सौरभ गोखले, अशोक समर्थ, सिद्धार्थ जाधव हे या चित्रपटात सक्रिय आहेत. स्वत:बरोबर ‘सिम्बा’बद्दल बरेच काही बोलण्याची तयारी दाखवलेली आहे.

First Published on: December 26, 2018 4:29 AM
Exit mobile version