‘ह.म.बने तु.म.बने’ची‌ मतदानासाठी जनजागृती

‘ह.म.बने तु.म.बने’ची‌ मतदानासाठी जनजागृती

सोनी मराठीवरील ‘ह.म. बने तु.म. बने’ ही लोकप्रिय मालिका नेहमीच आपल्या खुमासदार विनोदी शैलीत दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या प्रश्र्नांबद्दल भाष्य करत असते. मालिकेतील प्रत्येक भाग हा मनोरंजनासोबतच नकळत एक संदेश देऊन जातो. ‘ह.म.बने तु.म.बने’च्या या अस्सलपणा मुळेच ती प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. आता सर्वत्र निवडणूकीची धामधूम असताना अतिशय योग्य वेळ साधून ‘ह.म.बने तु.म.बने’ प्रेक्षकांना आपल्या मतदानाच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे.

एक नागरिक म्हणून आपण मतदार ओळखपत्र काढून घेतले आहे का, आपण ते व्यवस्थित हाताळतो का, आणि महत्त्वाचे म्हणजे आपला मतदानाचा हक्क बजावतो का, अशा प्रश्नांवर विनोदी कोपरखळ्या या भागात ‘ह.म.बने तु.म.बने’ प्रेक्षकांना देणार आहे. आजच्या काळात ही मालिका मनोरंजनाबरोबरच नागरिकांमधे जागरुकता निर्माण करत आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आपल्या मताचा फरक पडेल का, आपण मत दिलेला उमेदवार निवडून येईल, की अन्य कुणी.. असा विचार न करता प्रत्येकाने मतदान केले पाहिजे व त्याकरता आपले मतदार ओळखपत्र आवर्जून बनवून घेतले पाहिजे. हाच संदेश घेऊन येत आहे ‘ह.म.बने तु.म.बने’चा खास एपिसोड “मतदारा जागा हो”, उद्या ३ एप्रिल प्रसारीत होणार आहे.

हा ठरलेला सर्वाधिक प्रेक्षकपसंतीचा एपिसोड

ह.म.बने,तु.म.बने या मालिकेत कायमच वेगवेगळे विषय हाताळले जातात. त्यात मासिक पाळीबद्दल किती पुरुषांना माहीत आहे, हा विषय घेण्यात आला होता. घरात मुलगी एकटी असते आणि सोबत तिचे वडील. आई बाहेर गेलेली असते. अशा वेळी मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी सुरू होते. मग वडील काय करतात? कसं समजावून देतात? हे या भागात दाखवण्यात आलं होतं. या एपिसोडला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून या भागाचे पुर्नप्रक्षेपण दाखवण्यात आले होते.

First Published on: April 3, 2019 10:09 AM
Exit mobile version