आर.के. स्टुडिओची लवकरच पुनर्बांधणी! आगीत झालं होतं नुकसान

आर.के. स्टुडिओची लवकरच पुनर्बांधणी! आगीत झालं होतं नुकसान

आरके स्टुडिओ, चेंबूर

आठ महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीत चेंबूरमधील आरके स्टुडिओची फारच वाईट अवस्था झाली. सध्या संपूर्ण कपूर खानदान अर्थात कृष्णा कपूर आणि तिची मुले रणधीर, ऋषी, राजीव आणि मुली रिमा जैन आणि रितू नंदा हे आरके स्टुडिओच्या पुनर्बांधणीसाठी उपलब्ध पर्याय शोधत आहेत. आरके स्टुडिओने आतापर्यंत संपूर्ण सिनेसृष्टीला क्लासिक सिनेमा दिले आहेत.

आग लागल्यानंतर आरके स्टुडिओ

हिंदी सिनेसृष्टीतील शो मॅन म्हणून ओळख असणाऱ्या राज कपूरने १९४५ साली हा स्टुडिओ बांधला होता. आता बदलत्या काळानुसार दोन स्वरुपात स्टुडिओ बांधण्यात येण्याची संकल्पना असल्याचे ऋषी कपूर यांनी सांगितले. एका भागात स्टुडिओसाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, तर दुसऱ्या भागामध्ये जसी आधी स्टुडिओ होती, त्याचप्रमाणे तो बांधण्यात येईल, असा विचार असल्याचेही त्यांनी नमूद केले. काही बिल्डर्सशी वाटाघाटी सुरू असून, आम्ही व्यावसायिक गाळेही यामध्ये बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“सध्या स्टुडिओ बांधून कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही कारण बरेच लोक या बाजूला शूटिंग करण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत आमच्या भावनेचा समतोल साधण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि राज कपूर यांच्या आठवणी नेहमी जागृत ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल.” अशी भावना ऋषी कपूर यांनी यासंदर्भात व्यक्त केली.

दरम्यान रणधीर कपूर यांनी सांगितले की, “सध्या कोणीही या बाजूला शूटिंग करत नाही. सर्व जण गोरेगाव, नायगाव या बाजूला शूट करतात. कोणत्याही तिसऱ्या पक्षाला यामध्ये आणल्यास त्याला त्याचा जास्त मोबदला द्यावा लागणार. सध्या बिल्डर्सशी आमची बोलणी सुरू असून, कोणतीही गोष्ट ठरलेली नाही.” चेंबूरमधील आरके स्टुडिओमध्ये मागच्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी टेलिव्हिजन रियालिटी शो सुपर डान्सर २ च्या शूटिंग वेळी आग लागली होती.

First Published on: May 11, 2018 7:31 AM
Exit mobile version