महाराजांवर सर्वात मोठा चित्रपट बनवणार, राज ठाकरेंची घोषणा

महाराजांवर सर्वात मोठा चित्रपट बनवणार, राज ठाकरेंची घोषणा

‘रानबाजार’ या वेब सिरीजच्या जोरदार यशानंतर पुन्हा एकदा ‘प्लॅनेट मराठी’ आपली नवीन वेब सिरीज ‘अथांग’ घेऊन येत आहे. ‘अथांग’ येत्या 25 नोव्हेंबर रोजी प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त जुहू विलेपार्ले येथील ‘किंगसमन’मध्ये या वेब सिरीजचा ‘ट्रेलर लॉन्च सोहळा’ दिमाखात पार पडला. त्याप्रसंगी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या कलावंतांसोबतच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याला माननीय राजसाहेब ठाकरे यांची उपस्थिती हे मुख्य आकर्षण होते. चित्रपट सृष्टीतील सगळ्यांचे लाडके अशोक मामा म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचीही खास उपस्थिती होती.

‘अथांग’च्या ट्रेलर लॉन्चनिमित्त उपस्थित असलेल्या राजसाहेब ठाकरे यांची अभिनेत्री आणि या वेब सिरीजची निर्माती तेजस्विनी पंडित यांनी एक छोटेखानी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये चित्रपटसृष्टीशी आणि राजसाहेब ठाकरे यांच्या चित्रपटप्रेमाशी संबंधित काही प्रश्न त्यांना विचारण्यात आले, ज्याची राजसाहेबांनी हसत खेळत मिश्कील उत्तरे दिली.

तेजस्विनीसोबतच्या संवादात राजसाहेब म्हणाले की, “खरंतर राजकारणामध्ये मी अपघाताने आलो. फिल्म मेकिंग हे माझं पॅशन होतं.” यावर तेजस्विनी यांनी त्यांना विचारले की, “तुम्ही डायरेक्शन करताना आम्हाला कधी दिसणार आहात का?… ”या प्रश्नाचे सविस्तर उत्तर देताना राजसाहेब म्हणाले, “ राजकारण आणि चित्रपट या दोन मोठ्या गोष्टी आहेत आणि दोन दगडावरती पाय ठेवून चालणार… पण बघू मला कसं जमतंय ते… प्रॉब्लेम असा आहे की, आपल्या देशामध्ये सतत निवडणूक होत राहते. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी… पण या विषयाकडे लक्ष द्यायला मला वेळ मिळाला तर जरूर करेन. सध्या एक विषय माझ्या डोक्यात आहे. पण नुकतेच महाराजांवरती एवढे चित्रपट येऊन गेले की, मला आता त्या विषयाला हात लावण्याची हिंमत होत नाही. पण मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा गांधी चित्रपट पाहिला होता, त्यावेळी मला असं वाटलं होतं की महाराजांवर असा मोठा चित्रपट व्हायला हवा आणि माझं आता त्याच्यावर काम सुरू आहे. आणि मला असं वाटतं की तीन भागात ही फिल्मी येईल.”

या संवादात पुढे राज ठाकरे यांनी असेही म्हटले की, “एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर बायोपिक बनवण्यासाठी त्या व्यक्तीचे जीवनही त्या पद्धतीचे हवे. आपल्याकडे जर कुठल्या व्यक्तीवर बायोपिक बनवायचा झाला तर मला असं वाटतं की, इंदिरा गांधी यांच्या जीवनावर बायोपिक बनायला हवा. कारण इंदिरा गांधींचे जीवन जर पाहिलं तर ते एक रोलकॉस्टर आहे !”

राजसाहेब ठाकरे यांचं विधान हे नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. त्यामुळे तेजस्विनी पंडित यांना त्यांनी दिलेल्या या उत्तरातून भविष्यामध्ये राजसाहेब ठाकरे चित्रपटनिर्मिती आणि दिग्दर्शनात लवकरच येणार याबद्दलचे नवे संकेत मिळाले आहेत. विशेष उपस्थिती असलेल्या अशोक मामांनी म्हटले की, “मी आजपर्यंत कुठल्याही वेब सीरिजचा एवढा चांगला ट्रेलर पाहिलेला नाही. ट्रेलर पाहिल्यानंतर मला ही वेब सिरीज पाहण्याची उत्कंठा निर्माण झाली आहे, एवढा हा ट्रेलर छान झालेला आहे. त्यामुळे निश्चितच वेब सिरीजही तेवढीच चांगली असणार यात शंका नाही.”

सहा भागांमध्ये प्रसारित होणार असणाऱ्या ‘अथांग’ चे निर्माते प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर, तेजस्विनी पंडित आणि संतोष खरे हे त्रिकूट आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन जयंत पवार यांनी केले आहे. या वेब सिरीजमधील प्रमुख भूमिकेमध्ये धैर्यशील घोलप, भाग्यश्री मिलिंद, केतकी नारायण, संदीप खरे, उर्मिला कोठारे, निवेदिता सराफ, ऋतुजा बागवे, शशांक शेंडे, विक्रम गायकवाड, ओमप्रकाश शिंदे इत्यादी कलाकार आहेत.

First Published on: November 22, 2022 11:41 AM
Exit mobile version