रणवीर सिंग साकारणार कर्णधार कपिल देव

रणवीर सिंग साकारणार कर्णधार कपिल देव

रणवीर सिंग आणि कपिल देव

बॉलीवूडमध्ये सध्या रिक्रिएशन, बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. आता आणखी एक वास्तव घटनेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणवीर सिंग हा ‘८३’ चित्रपटातून १९८३ चा वर्ल्ड कपच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणार असून यामध्ये रणवीर भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार असून नुकतीच याची अधिकृत घोषणा एका कार्यक्रमातून करण्यात आली आहे. रणवीर सिंग सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शीत ‘सिम्बा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ‘सिम्बा’ हा या वर्षात डिसेंबर महिन्यामध्ये प्रदर्शीत होणार आहे. त्यामुळे सिम्बानंतर रणवीर पूर्णपणे ‘८३’ च्या चित्रीकरणावर लक्षकेंद्रीत करू शकेल. रिलायन्स एन्टरटेमेंट आणि फॅन्टम फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे.

‘८३’ च्या रंजक गोष्टी

आजच्या पीढीला भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्व चषक जिंकलेल्या क्षणांची माहिती करून देण्यासाठी हा चित्रपट बनवला जात आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात क्रिकेट या खेळाचे चाहते आहे. त्यांनी १९८३ च्या अंतिम सामन्याची रंजक गोष्ट ‘८३’ च्या माध्यमातून सांगितली जाणार आहे. चित्रपटाबाबत प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक कबीर खान यांनी सांगितले की, ‘जेव्हा मी टीम इंडियाने १९८३ चा वर्ल्डकप जिंकला तेव्हा मी शाळेत होतो. मला जराही अंदाज नव्हता की, भारतात क्रिकेटची परिभाषाच बदलेल. एक फिल्ममेकर म्हणून या सिनेमाची कथा साकारणे खूपच रोमांचक आणि उत्साह देणारं काम आहे.’

क्रिकेट वर्ल्ड कपचा इतिहास

भारताने दोनदा विश्व चषक जिंकले (सौजन्य – एचटी)

२५ जून १९८३ साली भारताने इतिहात रचला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाचे लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर क्रिकेट विश्व चषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी वेस्ट इंडीजच्या संघाला पराभूत करून विश्व चषक पटकावला होता. त्या प्रसंगाची आठवण आजही क्रिकेटप्रेमींच्या मनात ताजी आहेत. या घटनेची पुनरावृत्ती झाली ती म्हणजे २ एप्रिल २०११ साली. भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेच्या संघाला हरवून विश्व चषक जिंकला. कॅप्टन कूल महेंन्द्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हा सामना पार पडला. या घटनेचा काही भाग धोनीवर आधारित चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

First Published on: July 6, 2018 11:00 AM
Exit mobile version