अण्णा नाईकांचा सैनिकांसाठी मदतीचा हात

अण्णा नाईकांचा सैनिकांसाठी मदतीचा हात

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्याचसोबत या मालिकेतील अण्णा या व्यक्तिरेखेला प्रेक्षक आणि चाहत्यांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेमुळे अण्णांच्या चाहत्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे इतकंच नव्हे तर त्यांच्या कामाची सर्वजण वाहवा करत आहेत. त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. नुकतंच अण्णा म्हणजेच अभिनेता माधव अभ्यंकर यांनी एका चांगल्या कामासाठी पुढाकार घेतला.

ज्या सैनिकांच्या जिवावर आपण निर्भयपणे जगतो त्या सैनिकांच्या मदतीसाठी माधव अभ्यंकर यांच्या पुढाकाराने ‘रात्रीस खेळ चाले २’च्या सेटवर ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आला आहे. यात जमा झालेला निधी सैनिकांच्या मदतीसाठी पाठवला जाणार आहे. मालिकेचे शूटिंग पाहायला येणाऱ्या फॅन्सचादेखील या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

रात्रीस खेळ चाले २ मालिकेचे शूटिंग सावंतवाडीपासून अवघ्या ५-६ कि.मी. अंतरावर असलेल्या आकेरी या गावात सुरू आहे. अण्णा नाईक आणि शेवंतासह सर्व कलाकारांना पाहण्यासाठी व त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी सेटवर नेहमीच गर्दी होत असते. इतकंच नव्हे तर आकेरी आता टुरिस्ट स्पॉट ठरत आहे. या गर्दीच्या सहभागाने आपल्या देशातील सैनिकांसाठी काही करता आले तर? अशी कल्पना माधव अभ्यंकर यांना सुचली. जानेवारीपासून त्यांनी सेटवर ड्रॉप बॉक्स ठेवायला सुरुवात केली. ‘सेल्फी फॉर सेल्फ रिस्पेक्ट, सैनिकहो तुमच्यासाठी!’ असे या ड्रॉप बॉक्सवर लिहिले आहे. मी तुमच्यासोबत सेल्फी काढेन, पण आपल्या सैनिकांसाठी शक्य ती मदत करा, असे आवाहन अभ्यंकर चाहत्यांना करतात. फॅन्सनीदेखील त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून अगदी ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत जो तो आपल्या परीने सैनिकांसाठी मदत करताना दिसत आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना माधव अभ्यंकर म्हणाले, “सैनिकांच्या मदतीसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. ती यानिमित्ताने पूर्ण झाली. आमच्या टीमपासून आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली. फॅन्सनीदेखील आमच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. एक ड्रॉप बॉक्स पूर्ण भरला असून लवकरच दुसरा बॉक्सदेखील भरेल. त्यानंतर दोन्ही बॉक्समध्ये जमा झालेला निधी आम्ही सैनिकांच्या मदतीसाठी पंतप्रधान निधीला देऊ.”

First Published on: June 8, 2019 12:05 PM
Exit mobile version