कलाकाराच्या मृत्युपूर्वीच प्रसारमाध्यमांचा ‘जीवघेणा’ आततायीपणा !

कलाकाराच्या मृत्युपूर्वीच प्रसारमाध्यमांचा ‘जीवघेणा’ आततायीपणा !

पूर्वी प्रसारमाध्यमांचे स्वरूप बऱ्यापैकी मर्यादित होते. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काही निवडक वृत्तसमूह, आकाशवाणी आणि दूरदर्शन अशी मोजकी माध्यमे रोजच्या बातम्या लोकांपर्यंत पोचवित असत. काळानुरूप प्रसारमाध्यमांच्या संख्येमध्ये वाढ होत गेली. सुरुवातीच्या आकाशवाणी आणि काही वर्तमानपत्रे यांना सत्तरच्या दशकात दूरदर्शनची जोड मिळाली. कालानुरूप वर्तमानपत्रांच्या संख्येमध्ये वाढ झाली. दूरदर्शनच्या दोन मोजक्या वाहिन्यांच्या सोबतीला शेकडोंनी खाजगी वाहिन्या आल्या. त्यातही ज्या दिवसभर वृत्तांकनाचे काम करतात अशा खास वृत्तवाहिन्या सहभागी झाल्या. इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियाचा शिरकाव झाला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बातमीदारी सुरू झाली, ज्यावर कुठलाही अंकुश ठेवणारे नियम अथवा कायदा नाही. जसजशी संख्या वाढत गेली, बातमीदारीमध्ये स्पर्धाही वाढली. ‘ब्रेकिंग न्यूज’ कल्चर सुरू झाले. घटनेतील किंवा बातमीतील गांभीर्यापेक्षा ‘पहिली बातमी कोण देतय याला कुठेतरी महत्त्व प्राप्त झाले. याच धर्तीवर गेल्या आठवड्याभरात एक घटना घडली. ज्या घटनेने प्रसार माध्यमांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

गंभीर आजारामुळे प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. अचानक एका नामांकित वृत्तपत्राने त्यांच्या निधनाची बातमी दिली. पुढे सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि एकच गोंधळ माजला. अनेक नेटकऱ्यांनी श्रद्धांजलीच्या पोस्ट करायला सुरुवात केली. उलटसुलट चर्चांना-वादविवादांना ऊत आला. या साऱ्या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत त्यांच्या कुटुंबीयांनी आणि इस्पितळाने ‘विक्रम गोखले जरी गंभीर असले तरी हयात आहेत’ अशी प्रेस नोट प्रसिद्ध केली आणि वस्तुस्थितीचा खुलासा. या सर्व घटनेला प्रसार माध्यमांचा आततायीपणा जेवढा जबाबदार आहे, तेवढीच सोशल मीडियावरील नेटकऱ्यांची असंवेदनशीलताही कारणीभूत आहे. या एकूण घटनेवर चित्रपट क्षेत्रातील काही मान्यवर कलाकारांनी ‘आपलं महानगर’च्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्याद्वारे प्रसारमाध्यमांच्या विश्वासार्हतेवर साशंकता आणि सोशल मीडिया बाबत असलेली त्यांची प्रक्षुब्धता दिसून येते.

देवेंद्र पेम- लेखक आणि दिग्दर्शक


एकूणच सारा घडला प्रकार पाहता, प्रसारमाध्यमांनी अशा घटनांवर जबाबदारीने काम केले पाहिजे आणि काय एवढी त्याची घाई?… तुमच्यावर विश्वास ठेवून ज्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजलीच्या पोस्ट टाकल्या त्यांना किती पश्चात्ताप झाला… आणि हा सारा निर्माण झालेला संभ्रम पाहून विक्रमजींच्या कुटुंबीयांना किती मनस्ताप झाला ?… त्यावर त्यांना निवेदन द्यावी लागली. किती वाईट आहे हे….! एवढ्या मोठ्या वृत्तसंस्था आहेत, त्यांना खातरजमा करून घेणं कठीण होतं का?… असो पण त्यातून आपण धडा घेतला पाहिजे आणि मला सगळ्यांनाच सांगावसं वाटतंय की, विक्रमजींनी अभिनय करत असताना नेहमीच ‘बिटवीन द लाईन्स’ घेतल्या जाणाऱ्या पॉझचा नेहमी विचार केला. त्यात त्यांची मास्टरकी होती. आजच्या काळात आपणही ‘बिटवीन द लाईन’ पॉझ घेतला पाहिजे, जेणेकरून क्षणभर विचार करण्याची उसंत मिळेल… आणि मग त्यावर सद्सद्विवेक बुद्धी राखून व्यक्त होता येईल.

संजय खापरे- अभिनेता


यावर प्रतिक्रिया काय द्यावी हाच मोठा प्रश्न आहे. पण आमच्याकडे बघा बातम्या किती जबरदस्त आहेत त्यातून हे घडलंय. घडला प्रकार पाहून त्यांच्या मुलांना, नातवांना काय वाटलं असेल?… ज्यांनी कोणी या बातम्या पसरवल्या त्यांना याबाबत त्यांच्या कुटुंबीयांसोबत बोलून शहानिशा करता आली नाही का?… आपण असं म्हणतो की, जग खूप फास्ट झालंय, पण तसं नाहीय, आपण विनाकारण ते फास्ट केलय. आपण जगाच्या वेगासोबत नाही गेलो तर आपण मागे पडू असं प्रत्येक चॅनेललाच नाही तर प्रत्येक व्यक्तीलाही वाटू लागलंय. आणि हा जो स्पीड आहे तू कोणी डिक्लेअर केलाय?… हे पहीले शोधून काढणं फार गरजेचे आहे. अर्थात एकंदर सर्वच बाबतींतमध्ये हे स्तोम माजवलं गेलेलं आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान तर मला या मीडियाचा एवढा तिटकारा आला होता… अजिबात कुठल्याही मीडियाने सर्वसामान्य लोकांना विश्वासात घेतले नाही.

सविता मालपेकर- अभिनेत्री


मी शूटिंग करत असताना अचानक बातमी आली. एवढा मोठा कलाकार गेला म्हटल्यानंतर आपल्या हृदयाचा ठोका चुकतोच ना… इतका जवळचा मित्र, एक चांगला माणूस, एक चांगला कलाकार आणि असं अचानक त्याच्याबद्दल कळलं !.. माझं तर शूटिंगमध्येच मन लागेना. नंतर बातमी वार्‍यासारखी पसरली आणि लोकांनी श्रद्धांजली व्हायला सुरुवात केली. एवढा मनस्ताप झाला त्या गोष्टीचा. हे जे काही मीडियाचं चाललंय, ते चुकीचा आहे. आम्हाला जर एवढा त्रास होत असेल. तर त्यांच्या घरच्यांना किती त्रास झाला असेल?… माणसं जिवंत असतानाही, का इतकी घाई करतात मारण्याची. हे असं हल्ली बरंच चाललंय… अर्थात मीडियाकडून खूप काही चांगल्या गोष्टी घडतात पण या चुकीच्या गोष्टी मीडियाकडून होऊ नयेत अशी अपेक्षा आहे.

संतोष जुवेकर- अभिनेता


अफवा पसरवू नका किंवा एखाद्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय ती इतरांपर्यंत पोहोचवून नका, हे सगळ्यांना कळतंय. पण काही सुशिक्षित माणसं या गोष्टीला अजूनही बळी पडतात. हा मूर्खपणा आहे. तो करण्याआधी थोडा तरी विचार करावा. माझ्या आयुष्यात जर पहिलं काम करण्याची मला संधी मिळाली असेल तर ती विक्रमकाकांसोबत… मला मिळालेलं पहिलं नाटक ‘आणि मकरंद राजाध्यक्ष’ त्यांच्यासोबत केलं. माझ्या करिअरची सुरुवात मला या नाटकाने निमित्त एवढ्या मोठ्या महान कलाकारासोबत करायला मिळाली आणि तेव्हापासून माझे त्यांच्यासोबत ऋणानुबंध आहेत. बातमी ऐकल्यानंतर मी पूर्ण हललो, नॉस्टॅल्जिक झालो. मागची सर्व चित्र, आठवणी नजरेसमोर भराभरा यायला लागल्या. पण वृषाली काकूकडून किंवा तिकडच्या डॉक्टरकडून काही कळत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही बातमीवर विश्वास ठेवायचा नाही हे मी ठरवलं.

नागेश भोसले- अभिनेता

विक्रम गोखले हे खूप सीनियर ऍक्टर आहेत. पण सिनिअर असो किंवा ज्युनियर माणसं त्यांच्या मरणावर टपलेलेच असतात का? हा मला प्रश्न पडतो आणि यावर दोन मिनिटांचा विचारही न करता पटकन सोशल मीडियावर श्रद्धांजली देणं ?… प्रसारमाध्यम असोत किंवा कुठलीही इंडिव्हिज्युअल व्यक्ती यासाठी या दोघांनाही शिक्षा व्हायला हवी. असो, पण मला कळल्यावर मी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. जोपर्यंत घरच्यांकडून कळत नाही तोपर्यंत मला ते योग्य वाटले नाही, कारण माझे घरचे संबंध होते. 1989 ‘षड्यंत्र’ नावाची सिरीयल मी केली होती, त्यात विक्रमजी होते. तेव्हापासूनचे संबंध आहेत. अर्थात हे जे काही घडलं त्याबद्दल कोण काही करणार आहे का?… हा एक प्रश्न आहे मला… प्रसारमाध्यमांनी आततायीपणा तर केलाच पण वैयक्तिक माणसंदेखील इंटरनेटवरून फोटो घेऊन आणि खाली अगदी त्यांच्या कारकिर्दीचा मजकूर लिहून श्रद्धांजली वाहत होती. अरे, थांबा ना जरा… थोडा वेळ घ्या… कन्फर्म करा. बरोबर आहे लोकांपर्यंत खबर पोहोचली पाहिजे, ते कामच आहे तुमचं. पण माणूस अगदी जिवंत असताना तुम्ही मरणाची खबर पोहोचवता म्हणजे तुमचं माध्यम किती खोटय…!

श्वेता पेंडसे- लेखिका आणि अभिनेत्री


अत्यंत बेजबाबदारपणाचं आणि संतापजनक होतं ते सगळे. प्रसारमाध्यमं काय किंवा सोशल मीडिया काय कुठल्याही मीडियाने अत्यंत जबाबदारीने करायच्या गोष्टी असतात. कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता, त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांवर किंवा त्या व्यक्तीवर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांच्या मनावर किती खोल आणि विचित्र परिणाम होऊ शकतो याचा विचार न करता केली गेलेली ती कृती होती. म्हणजे श्रद्धांजली वाहण्यासाठी पण कशी काय चढाओढ असू शकते?… ही कुठली शर्यत आहे? कोणत्या रॅट रेसमध्ये आपण सामील होतोय?.. सोशल मीडियामुळे लोकांना व्यक्त होण्याची खुपच घाई झालेली आहे. आणि त्यांनाही हे कळत नाही की, आपण नकळतपणे या सगळ्यात सामील झालो आहे. प्रसारमाध्यमात काय मोठ-मोठी लोक चुकीची विधानं करून मोकळी झालीत. कलाकार म्हणून माझं त्यांच्यावर प्रचंड प्रेम असल्यामुळे मला तर या गोष्टीचा प्रचंड त्रास झाला. माझा तो दिवस कसा गेला हे मी सांगू शकत नाही. आणि इतक्या मोठ्या घटनेची कोणतीही शहानिशा न करता तुम्ही चक्क अशीबातमी देऊन कसे मोकळे होऊ शकता? मला हेच कळत नाही… ब्रेकिंग न्यूज च्या मागे लागून आपण बेजबाबदार आणि भावनाशून्य झालोय आणि हे खूप अति झाले आहे. बातमी न्यूट्रल असावी हे मला मान्य आहे आहे पण किमान थोडीशी सेन्सिटिव्हिटी असायलाच हवी. एखाद्या सामान्य व्यक्तीने पोस्ट केलं असतं तर कदाचित दुर्लक्षही झालं असतं पण तुम्ही प्रसारमाध्यम आहात. लोकांचा त्यावर विश्वास आहे. आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींचा आधार पत्रकार असतो. तुम्ही पत्रकारिता एवढी हलक्यात कशी घेऊ शकता ?…

दिग्पाल लांजेकर- लेखक आणि दिग्दर्शक


गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंड आपण पाहत आहोत की, सोशल मीडिया हातात आल्यापासून लोक अधिक इनपेशंट होत चाललेत. बऱ्याच मान्यवरांच्याबाबतीत हे आधी घडले आहे. ते बराच काळ हयात असून सुद्धा लगेच घाई करून त्यांना श्रद्धांजली वाहणे. एक्सप्रेस करण्याच्या नादात लोकांकडून संवेदनशीलता हरवत चालले की, काय?.. असा मला प्रश्न पडतो. प्रसारमाध्यम म्हणून आधी तर एखाद्याच्या निधनाची शहानिशा केली पाहिजे. आपण सुद्धा, माझी प्रतिक्रिया आधी गेली पाहिजे याची घाई करतोय की काय?… असं वाटायला लागत आणि उद्विग्नता येते. कुठलीही बातमी मग ती एखाद्याच्या निधनाची असो, आजारपणाची असो, अपघाताची असो याबाबतीत संयम ठेवून प्रतिक्रिया देणे शिकण्याची सामाजिक गरज आहे

विजय पाटकर- अभिनेता
अरे, आपण सगळेच जबाबदार आहोत. कन्फर्म तर करायला पाहिजे ना?.. डॉक्टरांना बोलू देत ना, मग बातमी करायला हवी… साधा कॉमन सेन्स आहे !… मलाही कळलं तेव्हा मी शांत राहिलो. आणि मग नंतर कळलं की, ते गंभीर आहेत. मलाही अनेकांकडून विचारणा झाली पण जोपर्यंत आपल्याला ऑफिशियली काही कळत नाही, तोपर्यंत बोलणार तरी कसं ना ?…

 

 

First Published on: November 27, 2022 10:24 AM
Exit mobile version