‘उमराव जान’ पुन्हा थिरकणार

‘उमराव जान’ पुन्हा थिरकणार

अभिनेत्री रेखा

आयफा २०१८ मध्ये बॉलीवूडची ‘उमराव जान’ रेखा २० वर्षांनंतर पुन्हा स्टेजवर थिरकणार आहे. २२ जून ते २४ जून दरम्यान होणाऱ्या आयफा अर्थात इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमीच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये रेखा स्टेजवर परफॉर्म करणार असून पत्रकार परिषदेत वरूण धवननं घोषणा केली. रेखाचा हा परफॉर्मन्स म्हणजे नक्कीच पुरस्कार सोहळ्याची शान असेल.

रेखाचा परफॉर्मन्स म्हणजे मोठं आकर्षण

रेखानं नेहमीच आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. २० वर्षांनंतर पुन्हा स्टेजवर परफॉर्मन्स ही प्रेक्षकांसाठीच नाही तर तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. ‘माझ्यासाठी रेखाजींचा लाईव्ह परफॉर्मन्स हे सर्वात मोठं आकर्षण आहे.’ असं सांगून वरूणनं रेखाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. तर यावेळी रेखाला कोणत्या गाण्यावर परफॉर्मन्स करणार? असा प्रश्न विचारला असता, ‘रहस्याचं दुसरं नाव म्हणजे मी, हे जर मी सांगितलं तर मग काय अर्थ राहील?’ असा प्रतिप्रश्न तिनं केला.

पुरस्कार सोहळ्याचं आकर्षण काय?

यावर्षी आयफा सोहळ्याचं निवेदन करण जोहर आणि रितेश देशमुख करणार आहेत. रेखाव्यतिरिक्त या सोहळ्यात रणबीर कपूर, शाहीद कपूर, श्रद्धा कपूर, अर्जुन कपूर, बॉबी देओल, क्रिती सॅनोन आणि लुलिया वंतुरदेखील आपला परफॉर्मन्स देणार आहेत.

फिल्मफेअरमध्ये केला होता २० वर्षांपूर्वी परफॉर्मन्स

रेखाने १९९७ साली झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये स्टेजवर परफॉर्म केलं होतं. त्यानंतर तिनं कधीही पुरस्कार सोहळ्यामध्ये परफॉर्म केलं नाही. आता २० वर्षांनंतर रेखा परत आपली जादू स्टेजवर दाखवायला सज्ज झाली आहे.

First Published on: June 13, 2018 2:24 PM
Exit mobile version