ऋषी कपूर भडकले, म्हणाले ‘गप्प बसा आता’, तर बँडवाल्याचा भलताच प्रश्न!

ऋषी कपूर भडकले, म्हणाले ‘गप्प बसा आता’, तर बँडवाल्याचा भलताच प्रश्न!

अभिनेते ऋषी कपूर

सध्या राज्यात सगळीकडे दिवाळीचा सण साजरा होत असताना आपले बॉलिवूड सेलिब्रिटी तरी त्यात कसे मागे राहणार? या बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या वेगवेगळ्या पार्टी होत असतात. त्या प्रामुख्याने मुंबईत होतात. मुंबईत झालेल्या एकता कपूरच्या दिवाळी पार्टीतला ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल भायानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ऋषी कपूर दिवाळी पार्टीमधून बाहेर पडत असताना त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अडवलं. त्यावर ऋषी कपूर भडडकले. गंमतीचा भाग म्हणजे भडकलेल्या ऋषी कपूर यांना तिथल्या बँडवाल्याने विचारलेला प्रश्न सगळ्यांसाठीच अजब होता!

‘मी इंडस्ट्रीतला ज्येष्ठ सदस्य आहे’

मुंबईत एका दिवाळी पार्टीमधून बाहेर पडताना ऋषी कपूर यांना छायाचित्रकारांनी गराडा घातला. फोटोंसाठी छायाचित्रकारांनी यावळी गलका केला. मात्र, यामुळे ऋषी कपूर चांगलेच भडकले. त्यांनी तिथल्या छायाचित्रकारांना दमच भरला! ‘तुम्ही आता गप्प बसा. तुम्हाला फोटो काढायचे असतील तर काढा. पण आवाज करू नका. आसपासच्या लोकांना हे नको वाटायला की सेलिब्रिटी गोंधळ घालतात. मी इंडस्ट्रीतला एक ज्येष्ठ सदस्य आहे. माझी विनंती आहे की तुम्ही इथ गोंधळ घालू नका’, असं त्यांनी सांगितल्यानंतर उपस्थित छायाचित्रकारांनी शांत राहाणं पसंत केलं. पण तेवढ्यात दिवाळीसाठी त्यांच्या घराबाहेर बँड वाजवणाऱ्या एका बँडवाल्याने त्यांना उलट प्रश्न विचारला.

…आणि ऋषी कपूर यांनी वेळ मारून नेली!

सगळ्यांना शांत राहण्याबद्दल दम भरणाऱ्या ऋषी कपूर यांना बँडवाल्याने विचारलं, ‘हा शांत राहण्याचा नियम आम्हाला सुद्धा लागू आहे का?’ या प्रश्नावर ऋषी कपूर यांनी लगेचच वेळ सावरून घेत हजरजबाबीपणाचा नमुना दाखवला. ‘अरे तुम्ही तर वाजवा. तो तुमचा जॉब आहे. त्याचा काही प्रॉब्लेम नाही’, असं ते म्हणाले. पत्रकारांना शांत बसायला सांगितलं आहे, असं विचारल्यावर ऋषी कपूर म्हणाले, ‘खरंतर आमच्याशिवाय ते जगू शकत नाहीत आणि त्यांच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. फक्त तुम्ही शांतता राखा’, असं सांगत त्यांनी यावेळी वेळ मारून नेली. दरम्यान, ऋषी कपूर यांच्या या व्हिडिओवर नेटिझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

First Published on: October 28, 2019 10:41 AM
Exit mobile version