आरएसएस नसते तर…, राजमौलीचे वडील विजयेंद्र प्रसाद यांनी केले अनुभव कथन

आरएसएस नसते तर…, राजमौलीचे वडील विजयेंद्र प्रसाद यांनी केले अनुभव कथन

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल (आरएसएस) गेल्या तीन-चार वर्षांपर्यंत माझे एक विशिष्ट मत होते. या संघटनेबद्दल मला फारशी माहिती नव्हती. पण या आरएसएसवर आधारित एक फिल्म लिहिण्याचे काम माझ्याकडे आले आणि माझे मतपरिवर्तन झाले. आरएसएस नसते तर काय झाले असते, ते माझ्या लक्षात आले, असे चित्रपट लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी सांगितले.

सिनेदिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचे वडील आणि ‘बाहुबली’ व ‘आरआरआर’ यासारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचे लेखक विजयेंद्र प्रसाद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राम माधव यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित होते. विजयवाडा येथे झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी आरएसएसवर चित्रपट तसेच वेबसीरिज लिहिणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

मला यानिमित्ताने काही गोष्टींची कबुली द्यायची आहे. मागील तीन-वर्षांपर्यंत मला संघाबद्दल फारशी माहिती नव्हती. महात्मा गांधी यांना रा. स्व. संघाने मारले, असे मी समजत होतो. पण मला जेव्हा आरएसएसवरील सिनेमाचे लेखन करायला सांगितले तेव्हा मी नागरपूरला गेलो होतो. तिथे मी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. तिथे एक दिवस मुक्काम केला होता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नक्की काय आहे, ते तेव्हा मला कळले, असे विजयेंद्र प्रसाद म्हणाले.

इतकी वर्षं मला एवढ्या मोठ्या संघटनेबद्दल माहिती नव्हते. जर आरएसएस नसते तर, काश्मीर आपल्याकडे नसते, ते पाकिस्तानात समाविष्ट झाले असते आणि पाकिस्तानमुळे लाखो हिंदूंचे शिरकाण झाले असते, असे सांगून विजयेंद्र प्रसाद यांनी, संघावर एक चित्रपट आणि वेबसीरिज बनवणार असल्याची घोषणा केली. जनतेला आपल्याबद्दलची माहिती पोहोचवली नाही, ही चूक संघाने केली आहे. ती दूर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे.

First Published on: August 20, 2022 1:17 PM
Exit mobile version