संभाजी भगतची शाहिरी ललकारी

संभाजी भगतची शाहिरी ललकारी

संभाजी भगत

आपल्या महाराष्ट्राला शाहिरांची मोठी परंपरा लाभलेली आहे. इतिहासापासून ते आजच्या कलियुगापर्यंत असा या शाहिरांचा प्रवास आहे. प्रबोधन, जनजागृती हा मुख्य हेतू असला तरी काळाप्रमाणे या शाहिरांनी स्वत:ला बदलून घेतलेले आहे. ‘कोर्ट’, ‘नागरिक’ या चित्रपटांसाठी तर ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकासाठी गीतलेखन करणारे लोकशाहीर संभाजी भगत यांनी जिथे अन्याय, तिथे आपली शाहिरी प्रत्यक्ष गाऊन सादर केलेली आहे. प्रतिष्ठेचे आवरण बाजूला ठेवून गल्लीबोळात आपल्या कलाकारांच्या संचासह पहाडी आवाजात जनजागृती केलेली आहे.

आता या शाहिरी मोहिमेला व्यापक दृष्टिकोन देण्यासाठी ‘संविधान बचाव मोहीम’ हाती घेतलेली आहे. मुंबई आणि परिसरात तीसहून अधिक कार्यक्रम जनजागृतीचे केलेले आहेत. संविधान मूल्यांचा प्रसार करणार्‍या लघुपटांची निर्मितीही केलेली आहे. ‘जय भारत, जय संविधान’ अशी घोषणा देत त्याला व्यापक रूप देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील चळवळीत सहभागी होणार्‍या कलाकारांना संघटित करण्याचे काम सुरू झालेले आहे. जसजशी जनतेच्या आवाजाची कोंडी होत आहे, तसतसा दबलेला आवाज बुलंद करण्यासाठी जागृती करणे गरजेचे वाटते.

संभाजी भगत यांनी आपली शाहिरी ललकारी फक्त स्वत:पुरती मर्यादीत न ठेवता नवगीतकार, संगीतकार यांनासुद्धा यात सामावून घेण्याचे ठरवलेले आहे. त्यानिमित्ताने लोकशाहीर संभाजी भगत यांच्या डफाबरोबर आता दिमडी, बेंजो, गिटार, ढोलक-ढोलकी ही नवकलाकारांकडून वाजवली जाणारी वाद्येही ताल धरणार आहेत.

First Published on: December 3, 2018 4:38 AM
Exit mobile version