अमिताभ बच्चननंतर हा अभिनेता झाला जखमी; चित्रिकरणादरम्यान अपघात

अमिताभ बच्चननंतर हा अभिनेता झाला जखमी; चित्रिकरणादरम्यान अपघात

संग्रहित छायाचित्र

 

नवी दिल्लीः ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यानंतर संजय दत्तही चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान जखमी झाल्याचे वृत्त आहे. केडीः द डेविल या कन्नड चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असताना झालेल्या अपघातात संजय दत्त जखमी झाला आहे.

केडीः द डेविल या चित्रपटात संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात बॉम्ब स्फोटाचे चित्रिकरण सुरु असताना अपघात झाला. या अपघातात संजय दत्तच्या हाताला, हाताच्या कोपऱ्याला आणि चेहऱ्याला मारा लागल्याची माहिती आहे. बंगळूर येथे हे चित्रिकरण सुरु होते. संजय दत्त जखमी झाल्यानंतर चित्रिकरण थांबवण्यात आले.

केजीएफ-२ च्या यशानंतर संजय दत्त अन्य चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. त्याचा बहुचर्चित चित्रपट मुन्नाभाई एमबीबीएसचा तिसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय दत्तने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्त आणि अरशद वारसी एका तुरुंगामध्ये दिसत आहेत. दोघांनी कैद्याचे कपडे घातले आहेत. पोस्टरसोबतच संजय दत्तने खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आमची प्रतिक्षा तुम्हा सर्वांपेक्षा जास्त होती. पण अखेर प्रतिक्षा संपली आहे. मी माझा भाऊ अरशद वारसीसोबत पुन्हा एकदा जबरदस्त चित्रपट घेऊन येत आहोत. तुम्हा सर्वांना हा चित्रपट पाहण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.

दरम्यान, गेल्या महिन्यात अमिताभ बच्चन हे चित्रिकरणादरम्यान जखमी झाले. अमिताभ बच्चन प्रोजेक्ट के चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमधून ही माहिती दिली.अमिताभ बच्चन म्हणाले, ‘हैदराबादमध्ये प्रोजेक्ट केच्या शूटिंगदरम्यान अॅक्शन सीन शूट केला जात होता. त्यादरम्यान मी जखमी झालो. यामुळे बरगड्या मोडल्या आहेत. तर, उजव्या बरगडीच्या स्नायूलाही दुखापत झाली आहे. अपघातामुळे शूट रद्द करण्यात आले आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्येही स्कॅन करण्यात आले आहे. आता मी घरी परतलो आहे… चालताना खूप त्रास होतोय. गोष्टी पूर्वपदावर यायला थोडा वेळ लागेल. वेदनांसाठी काही औषधेही दिली आहेत. जे काही काम करायचे होते ते तूर्तास स्थगित केले आहे. स्थिती सामान्य होईपर्यंत कोणतीही हालचाल न करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.”

 

 

 

First Published on: April 12, 2023 6:31 PM
Exit mobile version