मराठीत प्रथमच सात मराठी चित्रपटांची घोषणा

मराठीत प्रथमच सात मराठी चित्रपटांची घोषणा

आशय, विषय, कथेची मांडणी असो की सादरीकरण आणि उच्चत्तम निर्मितीमुल्यं या सर्वांच्या जोरावर आज मराठी चित्रपट साता समुद्रापार पोहचला आहे. मराठी मनोरंजन विश्व हे अधिकाधिक व्यापक बनत चाललेलं आहे. याचाच परिपाक म्हणून इतर भाषांमधील निर्मातेही मराठी चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरत आहेत. याचीच प्रचिती बुधवारी मुंबईत पार पडलेल्या एका रंगारंग सोहळ्यात आली. हिंदीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचे लेखन आणि निर्मिती करणा-या परितोष पेंटर यांच्या कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मितीसंस्थांनी एकत्रितपणे आपल्या आगामी सात नव्या चित्रपटाची घोषणा काल केली. विशेष म्हणजे सातही चित्रपटाचे दिग्दर्शन या क्षेत्रातील मातब्बर दिग्दर्शक मंडळी करणार असून त्यात अनेक कसलेल्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मनोज अवाना या चित्रपटांचे सहनिर्माते असून सेजल पेंटर आणि मंगेश रामचंद्र जगताप ऑनलाइन निर्माते आहेत.

याप्रसंगी बोलताना कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्सचे प्रमुख परितोष पेंटर म्हणाले की, मराठी ही माझी मातृभाषा आहे. मी आजवर हिंदीमध्ये अनेक चित्रपट आणि मालिकांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. हे करत असातानाच मराठीमध्येही काही तरी करावं असा विचार कायम मनात होता. गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटाने जी उंची गाठली आहे ती स्तुत्य आहे. या मराठी चित्रपटसृष्टीचा भाग होत असल्याचा मला आनंद आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या रुंदावलेल्या कक्षा आणखीन मोठया करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आशय विषयाच्या बाबतीत मराठी चित्रपटाने स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. या सात वेगवेगळया चित्रपटांच्या माध्यमातून निर्मितीचा भक्कम पूल उभारण्याचा आमचा मानस आहे.


हेही वाचा :

‘सैराट’मधील सूरज पवार ऊर्फ ‘प्रिन्स दादा’ला अटक होण्याची शक्यता, नेमके प्रकरण काय?

First Published on: September 15, 2022 5:51 PM
Exit mobile version