‘ती शांतपणे निघून गेली’, राज बब्बरला आली स्मिता पाटीलची आठवण

‘ती शांतपणे निघून गेली’, राज बब्बरला आली स्मिता पाटीलची आठवण

स्मिता पाटील आणि राज बब्बर

लोकप्रिय अभिनेत्री स्मिता पाटील हीचा आज ६४ वा जन्मदिन. यानिमित्ताने चाहत्यांनी आज सोशल मीडियावर तिच्या आठवणी जागवल्या. स्मिता यांचे पती राज बब्बरने देखील ट्विटरवर स्मिताच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये राज बब्बरने म्हटले आहे की, “मी तिच्यासोबत खूप कमी वेळी घालवला, मात्र ते दिवस कायम लक्षात राहिलेत.” या ट्विटसोबत राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांचा एक सुंदर फोटोही पोस्ट केला आहे.

“स्मिता पाटीलच्या जन्मदिनी तिची आठवण येणे स्वाभाविक आहे. स्मिता सोबत कमी वेळ घालवता आला, मात्र ते दिवस कायम लक्षात राहिलेत. ती शांतपणे निघून गेली. मात्र त्या शांततेचा आवाज कधीही लुप्त होणार नाही.”, असा मजकूर बब्बर यांनी ट्विटमध्ये लिहिला आहे. स्मिता पाटील यांच्याशी लग्न होण्याआधी राज बब्बर आधीपासूनच विवाहीत होते. स्मिता पाटील यांच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता.

 

स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरनेही स्मिता पाटील यांना जन्मदिनानिमित्त अभिवादन केले आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने स्मिता पाटील यांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो अपलोड केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये प्रतीक म्हणतो, “happy birthday to my gorgeous lady”. प्रतीकला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच स्मिता पाटील यांचे निधन झाले होते.

यासोबतच प्रतीक बब्बरने आपल्या आईचा आणखी एक फोटो इन्स्टावर अपलोड केलाय. ज्यात तो म्हणतो, “श्वास घेऊ नको… लोक काय विचार करतील.” सोबत स्मिता पाटील यांचा जीवनकाळाचा संदर्भ देऊन रेस्ट इन पॉवर असं लिहिलं आहे. या फोटोमध्ये स्मिता पाटील या लग्नाच्या जोड्यात दिसत असून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत.

राज बब्बर आणि स्मिता पाटील हे ‘भीगी पलके’ चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. आपल्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना बब्बर यांनी एकदा म्हणाले होते की, पहिल्या भेटीत आमच्यात खटके उडाले होते. मात्र आमच्यातला हे सौम्य खटकेच आमच्या प्रेमसंबंधाला पुरक असे ठरले. त्यानंतर स्मिता आणि राज बब्बर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.

बाळंतपण झाल्यानंतर स्मिता पाटील यांचा १९८६ रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रतीकला त्याच्या आजी-आजोबांकडे सोपविण्यात आले. त्यानंतर राज बब्बर यांनी पुन्हा एकदा आपली पहिली पत्नी नदिरासोबत संसार सुरु केला. स्मिता यांच्याशी विवाहबद्ध होण्याअगोदरच त्यांना जुही आणि आर्या नावाच्या दोन मुली होत्या. दुसऱ्या बाजुला प्रतीक हा आपल्या आजी-आजोंबासोबत आई-वडिलांशिवाय वाढला.

First Published on: October 17, 2019 6:19 PM
Exit mobile version