६ लोककलांमधून… छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा!

६ लोककलांमधून… छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा!

हिरकणी

मातृदिना दिवशी अभिनेता,दिग्दर्शक प्रसाद ओकने ‘हिरकणी’ या आपल्या आगामी चित्रपटाचं पोस्टर सोशलमिडीयावर शेअर केला आणि चित्रपटाची उस्तुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. काही दिवसांपूर्वीच ‘हिरकणी’चं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता या चित्रपटातील शिवराज्याभिषेक गीताचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये नऊ कलाकार सहा लोककलांमधून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा देणार आहेत.

चिन्मय मांडलेकर,जितेंद्र जोशी,पुष्कर श्रोत्री,हेमंत ढोमे, प्रियदर्शन जाधव,सिद्धार्थ चांदेकर,राहुल रानाडे,सुहास जोशी आणि क्षिती जोग या दिग्गज कलाकारांची मोठी फौजच चित्रपटात आहे. शिवराज्याभिषेक गीताच्या टीझरमध्ये यांची झलक पाहायला मिळते. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसाद ओक आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त राजेश मापुसकर पहिल्यांदाच एकत्र आले आहे.

रायगडाचे दरवाजे बंद झाल्यावर आपल्या बाळासाठी गडाच्या कड्यावरून जीव मुठीत घेऊन उतरणाऱ्या हिरकणीची कथा सगळ्यांना माहितेय. या धाडसी आईची ऐतिहासिक गोष्ट ‘हिरकणी’मध्ये बघायला मिळणार आहे. “प्रत्येक आई असतेच… हिरकणी” अशी टॅगलाइन या चित्रपटाची आहे. यामध्ये शिवरायांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

इरादा एंटरटेन्मेंटच्या फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लॉरेन्स डिसुझा सहनिर्माते आहेत. तर राजेश मापुसकर यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी पेलली आहे. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

First Published on: September 10, 2019 9:47 AM
Exit mobile version