अखेर शिवानी झाली सलमानची हिरोईन!

अखेर शिवानी झाली सलमानची हिरोईन!

स्वप्नं बघितली तरच खरी होतात !!’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘सातारचा सलमान’या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. तरुणींना भुरळ घालणाऱ्या सुयोग गोऱ्हेची झलक यात आपल्याला पाहायला मिळाली. या टिझरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच उत्सुकता होती, ती ‘सातारचा सलमान’ची हिरोईन कोण? याची. मात्र हे गुपित अखेर उलगडले असून यात सायली संजीव आणि शिवानी सुर्वे आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच या दोघींचे कॅरेक्टर पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.

पोस्टरवरील सायलीचा लूक पाहता ती ‘माधुरी माने’ या निरागस, सोज्वळ मुलीची भूमिका साकारत असून शिवानी ‘दिपिका भोसले’ या बोल्ड, बिनधास्त मुलीची भूमिका साकारत आहे. यात सुयोगची नायिका नेमकी कोण आहे? म्हणजे दोघीही का कोणीतरी एक? हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन हेमंत ढोमे यांनी केले आहे. हेमंत ढोमे यांनी मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नाविन्यपूर्ण विषय हाताळले आहेत, त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना काहीतरी धमाकेदार, भन्नाट पाहायला मिळणार, हे नक्की.

या आधी आलेल्या टीझरमध्ये ‘ए हिरो’ हाकेवर सुयोगची दमदार एन्ट्री बघीतली. सुयोगची वेगवेगळी रूपं या टिझर मध्ये आपल्याला दिसत आहेत. स्वप्न बघणाऱ्या आणि छोट्या गावातून येणाऱ्या एका सामान्य मुलाला जेव्हा त्याजी लाईफच हिरो बनवते, तेव्हा नक्की काय होते हे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. याशिवाय या टिझरमध्ये अजून एक सुखद धक्का देणारी गोष्ट आहे. टिझर सुरु झाल्यावर ऐकू येणारा आवाज ओळखीचा वाटतोय ना? तर हा आवाज आहे आपल्या सर्वांच्याच लाडक्या अमेय वाघचा. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ हा आगामी चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

First Published on: September 14, 2019 3:55 PM
Exit mobile version