यादगार शुक्रगुजार

यादगार शुक्रगुजार

Yaadgaar Shukragujar

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात राहणार्‍या सच्च्या रंगकर्मीचे एकदा तरी शिवाजी नाट्य मंदिरमध्ये काम करायला मिळावे असे स्वप्न असते, तसे भारतातल्या रंगकर्मींना जुहू येथे असलेल्या पृथ्वी थिएटरमध्ये एकदा तरी भूमिका साकार करायला मिळावी असे वाटत असते. कपूर घराण्याचे चित्रपटसृष्टीमध्ये जेवढे योगदान राहिले आहे, तेवढेच त्यांनी हिंदी, इंग्रजी रंगभूमीसाठीसुद्धा कार्य केले आहे. पृथ्वी थिएटर ज्याचा कार्यभार शशी कपूरने सांभाळला, पुढे त्यांची कन्या संजना कपूरही त्यासाठी वेळ देत आलेली आहे. इतरवेळी या रंगमंचावर बर्‍याचवेळा संध्याकाळी अभिनयाबरोबर संवादाची रेलचेल पहायला मिळते, पण यावेळी यादगार असा शुक्रगुजार हा विशेष कार्यक्रम २८ फेब्रुवारीला आयोजित केला आहे. यानिमित्ताने सुरेल गीतांचा अनुभव रसिक प्रेक्षकांना घेता येईल.

पृथ्वी थिएटर प्रत्येकवर्षी मेमोरिअल कॉन्सर्टचे आयोजन करते. यंदा या कॉन्सर्टचे ३५ वे वर्ष आहे. त्यात त्यांनी दिवंगत अभिनेते, निर्माते शशी कपूर आणि त्यांच्या पत्नी जेनिफर कपूर यांच्या आठवणी जागवण्याचे ठरवले आहे. ही संध्याकाळ यादगार व्हावी यासाठी शुक्रगुजार हा विषेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सत्यजित रे यांच्या शेक्सपिअरवाला या शिर्षक गीतापासून तर ते कल्याणजी आनंदजी यांच्या फिल्मवाला प्रॉडक्शनच्या जबजब फुल खिले पर्यंत संगीताचा नजराणा इथे सादर केला जाणार आहे. झाकीर हुसेन हे या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. रात्री ८ वाजता पृथ्वी थिएटरमध्ये रसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमाचे साक्षिदार होता येईल. संगीतसाथ करण्यासाठी नामवंत वादक कलाकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. तबल्यासाठी मराठीतला आदित्य कल्याणपूरकर याचा यात सहभाग आहे.

First Published on: February 25, 2019 4:51 AM
Exit mobile version