सिद्धार्थ जाधव फॉर्मात

सिद्धार्थ जाधव फॉर्मात

Sidharth Jadhav

साधारण वीस वर्षांपूर्वी रूपारेल कॉलेजमध्ये शिकणार्‍या सिद्धार्थ जाधवला कोणी पाहिले असते तर तो भविष्यात महाराष्ट्राचा स्टार किंवा बॉलिवूडचा एक नामांकीत कलाकार होईल असे किंचितही वाटले नसते. सडपातळ शरीरयष्टी, कुरळे केस, साधी राहणी असे त्याचे व्यक्तिमत्त्व होते. शिवडीमध्ये होणार्‍या उत्सवात भाग घेतला, स्वत:तल्या कलेला तपासले, इथेच कौतुक झाले म्हणताना स्वत:ला बाहेर आजमवायला काय हरकत आहे या एका इराद्याने अनेक एकांकीका स्पर्धेत त्याने भाग घेतला. महाविद्यालयाच्यावतीने आयएनटीच्या होणार्‍या स्पर्धेत आपलीही वर्णी लागावी असे त्याला वाटत होते. दोन-चार वेळा प्रयत्न केल्यानंतर तिसर्‍यांदा कोठे बर्‍यापैकी भूमिका त्याच्या वाट्याला आली.

सहकारी तत्त्वावर काही हौशी नाटके त्याने केली. यात त्याची केदार शिंदेबरोबर ओळख झाली. ती इतकी झाली की केदारने ज्या ज्या नाटकांची, चित्रपटांची निर्मिती केली त्यात सिद्धार्थ असायलाच हवा असा त्याचा दावा होता. ‘लोचा झाला रे’ हे केदार शिंदे लिखित, दिग्दर्शित नाटकात सिद्धार्थने आदिमानवाची भूमिका केली. तोच त्याच्या यशाचा मार्ग ठरला. महेश मांजरेकरनेसुद्धा आपल्या बर्‍याच चित्रपटांमध्ये सिद्धार्थला महत्त्वपूर्ण भूमिका करायला दिलेली आहे. सिद्धार्थ रूपेरी पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे म्हटल्यानंतर त्याची मुख्य भूमिका असलेली अनेक नाटके व्यावसायिक रंगमंचावर दाखल झाली. जी काही नाटके गाजली त्यात जागो मोहन प्यारे, गेला उडत अशी काही नाटके सांगता येतील. या बेट्याने बॉलिवूडचा पडदाही गाजवलेला आहे. ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्नस्’, ‘सिटी ऑफ गोल्ड’ या चित्रपटांमध्ये तो होता. हिंदीमध्ये जे रिअ‍ॅलिटी शो होतात त्यात मराठी कलाकाराचा निभाव लागेलच याची खात्री देता येत नाही. त्यातसुद्धा सिद्धार्थने बाजी मारलेली आहे. ‘आजा नच ले’ या नृत्यावर आधारित असलेल्या कार्यक्रमात आपला प्रभाव त्याने दाखवलेला आहे. सतत व्यस्त असणार्‍या या कलाकाराचा हा आठवडा फॉर्मात आहे हे सांगून पटायचे नाही.

रोहित शेट्टी याने बहुचर्चित ‘सिम्बा’ या चित्रपटाचे प्रमोशन सुरू केलेले आहे. रणवीर सिंग या कलाकारासोबत ज्या कलाकाराचे नाव आवर्जून घेतले जाते त्यात सिद्धार्थच्या नावाचाही समावेश आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो जिकडेतिकडे दिसतो आहे. रितेश देशमुखचा ‘माऊली’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. त्यातसुद्धा सिद्धार्थ महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो आहे. मराठीत जेवढे रिअ‍ॅलिटी शो आहेत, त्यात तो दिसायला लागणार आहे. सय्यामी खेर ही या चित्रपटाची नायिका आहे. तिला मराठी उत्तम बोलता येत असले तरी ग्रामीण लहेजा जो भाषेत यायला पाहिजे तो तिला आणता येत नव्हता. चित्रीकरणाच्या दरम्यान सिद्धार्थने फावल्या वेळेत ही भाषा तिला शिकवली. त्याच्या या सहकार्याने त्या दोघांत छान गट्टी जमलेली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनात ते प्रकर्षाने जाणवणार आहे. या सिद्धार्थचा या शुक्रवारी ‘घर होतं मेणाचं’ हा मराठी चित्रपटही प्रदर्शित होत आहे. ज्याचा विषय ‘मी टू’ वर आधारित आहे. त्याचेसुद्धा प्रमोशन तो करतो आहे. अलका कुबल, मोहन जोशी हे कलाकार त्याच्यासोबत असतात. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सिद्धार्थ जाधव फॉर्मात आहे असेच म्हणावेसे वाटते.

First Published on: December 7, 2018 5:02 AM
Exit mobile version